मुंडके छाटून खून केलेल्या तरुणाची ओळख पटली; खुनी कोण हे अद्याप रहस्यच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 08:17 PM2023-01-19T20:17:50+5:302023-01-19T20:18:01+5:30
पोलिसांच्या शोधमोहिमेला यश आले असून आता खुन्याचा शोध सुरु आहे
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत चार दिवसांपूर्वी मुंडके छाटून खून करण्यात आलेल्या अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. अजय व्यंकटराव नीलवर्ण उर्फ देशमुख (२१,रा. मंगरुळ (पापट), ता. मानवत, जि. परभणी, ह.मु. रांजणगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या मारेकऱ्याचा शोध सुरू आहे.
अशी पटली खून झालेल्या तरुणाची ओळख
रांजणगावात एक तरुण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली. व्यंकटराव देशमुख या ट्रकचालकाचा मुलगा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मयत तरुणाचे फोटो दाखविले असता व्यंकटराव देशमुख व नीताबाई देशमुख या दोघांनी तो मुलगा आमचाच तीन-चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहा.आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेत मयताची ओळख पटविली. खून करण्यात आलेला अजय व त्याची आई हे एकाच कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. मृत अजय यापूर्वीही आठ-आठ दिवस घरीही येत नसल्याने आम्ही त्याचा शोध घेतला नसल्याचे अजय याचे वडील व्यंकटराव व आई नीताबाई यांनी पोलिसांना सांगितले.
मारेकऱ्याचा शोध सुरू
अजयसोबत काम करणाऱ्या काही कामगारांची पोलिसांनी चौकशी केली. अजय यास दारूचे व्यसन होते. खून का व कोणी केला, याचे गूढ कायम आहे. पोलिसांची ५ पथके तपास करत आहेत.