विद्यापीठात चुकीच्या पद्धतीने आंदोलने आणणारे पडद्यामागील सूत्रधार रडारवर: कुलगुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 01:16 PM2024-10-16T13:16:33+5:302024-10-16T13:17:04+5:30
विद्यापीठामध्ये आंदोलनावेळी कुलगुरू गाडीवरील ध्वजाचे नुकसान, शिविगाळीचा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निषेध
छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठात नियमानुसार होणाऱ्या आंदोलनाचे नेहमीच स्वागत केले आहे. त्यातून समस्याही सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने आंदोलने करणे, कुलगुरूंच्या गाडीचा ध्वज तोडणे, शिवीगाळ करणारी आंदोलने निषेधार्ह आहेत. मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अशा आंदोलनाचा निषेध नोंदविण्यात आला. विद्यापीठात चुकीच्या पद्धतीने आंदोलने घडवून आणणाऱ्या पडद्यामागील सूत्रधार रडारवर असल्याची माहिती कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी बैठकीत दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रशासकीय इमारतीमध्ये मंगळवारी (दि.१५) झाली. यावेळी नॅक मूल्यांकनासंदर्भात माहितीही प्रशासनातर्फे सदस्यांना देण्यात आली. बैठकीत नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली. ठरावावर चर्चा झाल्यानंतर डॉ. योगिता हाेके पाटील यांनी विद्यापीठात विद्यार्थ्यांना आंदोलने करण्याची गरजच पडू नये, त्यांच्या समस्या तत्काळ सुटल्या पाहिजेत, अशी मागणीच केली. नियमानुसार होणाऱ्या आंदोलनांना परवानगी देण्याचा विषय त्यांनी उपस्थितीत केला. या विषयावर वादळी चर्चा झाली. या चर्चेत सदस्य डॉ. अंकुश कदम, डॉ. रविकिरण सावंत, प्राचार्य डॉ. भारत खंदारे, डॉ. गौतम पाटील, डॉ. व्यंकटेश लांब, डॉ. अपर्णा पाटील यांनीही सहभाग नोंदविला. त्यावर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांनी आंदोलनापूर्वी मागण्याचे निवेदन प्रशासनाला दिले पाहिजे. मागण्यांवर प्रशासनासोबत चर्चा झाली पाहिजे. चर्चेनंतरही मागण्या न सुटल्यास आंदोलने करावीत. मात्र, कोणतीही माहिती न देता आंदोलने करून गाड्या, विद्यापीठ ध्वजाचे नुकसान सहन केले जाणार नाही. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल. काही आंदोलनांमध्ये कुलगुरूंच्या नावाने दिलेल्या शिव्याची माहितीही कुलगुरू डॉ. फुलारी यांनी बैठकीत दिली. तेव्हा सर्व सदस्यांनी या कृतीचा निषेध नोंदविल्याचे सूत्रांनी सांगितले.
परीक्षा सहायकांचे शासनमान्य पदावर समायोजन
विद्यापीठ निधीतून १३ परीक्षा सहायकांची वेतनश्रेणीवर नियुक्ती केलेली आहे. या सहायकांना शासनमान्य पदावर सामावून घेण्यासाठी विद्यापीठातील कनिष्ठ सहायक, डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या मंजूर पदापैकी ५३ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर परीक्षा सहायकांना कनिष्ठ सहायक किंवा डाटा एन्ट्री ऑपरेटर हे पदनाम देऊन शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली.