‘विकी डोनर’ होणे आता बंद, एकाच दाम्पत्यासाठी देता येणार ‘स्पर्म’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 11:51 AM2022-10-11T11:51:06+5:302022-10-11T11:51:06+5:30

नवीन कायदा आला पण अंमलबजावणीसाठी गाईड लाईनची प्रतीक्षा

Being a 'vicky donor' is now closed, 'sperm' can be given for a single couple | ‘विकी डोनर’ होणे आता बंद, एकाच दाम्पत्यासाठी देता येणार ‘स्पर्म’

‘विकी डोनर’ होणे आता बंद, एकाच दाम्पत्यासाठी देता येणार ‘स्पर्म’

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
काही वर्षांपूर्वी ‘विकी डोनर’ हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. या चित्रपटातील अभिनेत्याने अशा युवकाची भूमिका साकारली, त्याने ‘स्पर्म’ विकून मोठी कमाई केलीच. त्याबरोबरच अनेक दाम्पत्यांचे आई-वडील होण्याचे स्वप्नही पूर्ण केले. मात्र यापुढे कोणाला असे ’विकी डोनर’ होता येणार नाही. म्हणजे वारंवार ‘स्पर्म’ दान करता येणार नाही. नव्या कायद्यानुसार एका डोनरला एका दाम्पत्यासाठीच ‘स्पर्म’ दान करता येईल.

औरंगाबाद आजघडीला दोन स्पर्म बँक (एआरटी बँक) आहेत. त्यांची ‘पीसीपीएनडीटी‘ कायद्यांतर्गत नोंदणी आहे. नव्या कायद्यानुसार अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून गाईडलाईन आणि नियमांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. जुन्या कायद्याप्रमाणे दात्याकडून स्पर्म घेता येईना आणि गाईडलाईनअभावी नव्या कायद्यानुसारही काम करता येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जानेवारीपासून दात्याकडून वीर्य घेणेच बंद आहे. परिणामी, दात्याच्या स्पर्मच्या माध्यमातून अपत्य प्राप्तीसाठी इच्छुक असलेली दाम्पत्ये ‘वेटिंग’वर आहेत. स्पर्म बँकांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आणि कागदपत्रे जमा केल्यानंतर महापालिकेकडून स्पर्म बँकेची पाहणी करून नव्या कायद्यानुसार नोंदणी करून घेतली जाणार आहे.

नव्या कायद्यामुळे हे टळणार
पूर्वी एक डोनरचे स्पर्म अनेक दाम्पत्यांसाठी देता असे. म्हणजे एकाच डोनरच्या माध्यमातून अनेकांना अपत्यप्राप्ती होते. यातून असे अपत्य एकसारखे दिसणे, अशा अपत्यांचे भविष्यात विवाह झाले तर गुंतागुंत परिस्थिती उद्भवू शकते. परंतु नव्या कायद्यामुळे असे होणे टळणार असल्याचे स्पर्म बँकेच्या संचालकांनी सांगितले. मात्र गाईडलाईनअभावी नव्या कायद्याची अंमलबजावणीच करता येत नसल्याचेही सांगण्यात आले.

सर्व तपासण्यानंतरच वापर
स्पर्म डोनरचा रक्तगट, व्यक्तिमत्त्व आणि काही आजार आहे का, यासंदर्भात सर्व तपासण्या झाल्यानंतर ‘स्पर्म’चा वापर केला जातो. नव्या कायद्यानुसार आता डोनरला आयुष्यात एकदाच स्पर्म दान करता येणार आहे.
- डाॅ. मनीषा काकडे, वंध्यत्व निवारणतज्ज्ञ

राज्य शासनाकडून येईल मार्गदर्शन
स्पर्म बँकेसंदर्भात राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. यातून नवीन नियम आणि शंकाचे निराकरण होईल. त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Web Title: Being a 'vicky donor' is now closed, 'sperm' can be given for a single couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.