खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात वेग कमी होताच पाठीमागून बसची धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू
By सुमित डोळे | Published: September 9, 2023 12:10 PM2023-09-09T12:10:06+5:302023-09-09T12:11:33+5:30
हर्सूल रस्त्यावरील खड्ड्याने तरुणाचा जीव घेतला; दहा दिवसांपासून नवा रस्ता चौकोनी आकारात खोदून ठेवलेला
छत्रपती संभाजीनगर : शहरातून मिळालेले काम पूर्ण करण्यासाठी गावाकडून निघालेल्या ३़० वर्षीय मुख्तार रशीद शहा या तरुणाचा हर्सूल रस्त्यावरील खड्ड्याने जीव घेतला. शुक्रवारी दुपारी तो दुचाकीने शहराकडे येत असताना जुना नाक्याजवळ त्याला एसटी बसची धडक बसली. यात थेट डोक्यावरच पडल्याने मुख्तार याचा जागीच मृत्यू झाला.
मुख्तार चौक्याच्या पुढे असलेल्या हातमाळी गावचे रहिवासी होते. अन्य दोन भावांसोबत ते प्लंबिंगचा व्यवसाय करत. शुक्रवारी शहरातून कामाची ऑर्डर मिळाल्याने मुख्तार दुचाकीवरून शहराकडे निघाले होते. फुलंब्री हर्सूल रस्त्यावरील मथुरा लॉन समोरून येत असताना मोठ्या खड्ड्याजवळ वेग कमी करून त्याने बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागून येणाऱ्या एसटी बसचा वेग अधिक असल्याने बसची त्यास धडक बसली. यात मुख्तार खड्ड्यात कोसळला. घटनेची माहिती कळताच हर्सूलचे उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी धाव घेत त्यास जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुख्तारचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर बसचालक स्वत:हून ठाण्यात हजर झाल्याचे उपनिरीक्षक खिल्लारे यांनी सांगितले.
प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघातात वाढ
स्थानिकांच्या माहितीनुसार, जळगाव महामार्गावर मनपाच्या जुन्या नाक्याजवळ दहा दिवसांपासून रस्त्यावर चौकोनी आकारात रस्ता खोदून ठेवला आहे. त्यानंतर त्याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले. परिणामी, पावसामुळे त्यात पाणी साचले. त्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकी चालक तो खड्डा टाळण्याचा प्रयत्न करतात. मुख्तारने तसाच प्रयत्न केला. मात्र, त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अपघातानंतर दोन दुचाकी चालकांचा अपघात झाला. मात्र, वेळीच तोल सावरल्याने हानी टळली.