'पार्ट टाईम जॉब' च्या मेसेजवर विश्वास, टिसीएसची कर्मचारी ४ लाख रुपये गमावून बसली
By सुमित डोळे | Updated: October 12, 2023 13:33 IST2023-10-12T13:32:43+5:302023-10-12T13:33:05+5:30
तीन दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख रुपये उकळले.

'पार्ट टाईम जॉब' च्या मेसेजवर विश्वास, टिसीएसची कर्मचारी ४ लाख रुपये गमावून बसली
छत्रपती संभाजीनगर : टेलिग्राम ॲपवर 'पार्ट टाईम जॉब' चा आलेल्या मेसेज वर विश्वास ठेवून टिसीएसमध्ये उच्चशिक्षित कर्मचारी चार लाख रुपयांना फसली. सायबर गुन्हेगारांनी तीला विविध कारणे सांगत अवघ्या तीन दिवसांमध्ये ही रक्कम उकळली. याप्रकरणी बुधवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पहाडसिंगपुऱ्यात कुटूंबासह राहणारी ३० वर्षीय नेहा (नाव बदलले आहे) टिसीएस कंपनीत कामाला आहे. काही दिवसांपुर्वी टेलिग्राम ॲपवर तिला ऑनलाईन पार्टटाईम जॉब संदर्भात मेसेज प्राप्त झाला होता. तिने त्यावर रिप्लाय केला. त्यानंतर प्रिसमा शाहु नामक तरुणीने तिच्यासोबत संपर्क केला. www.eplatformworkz.net संकेतस्थळावर लॉग इन करण्यास सांगून ५ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर संकेतस्थळावर रेटिंग पूर्ण करुन पैसे मिळतील, असेही आश्वासन दिले.
रक्कम दिसून मायनसमध्ये जायची
२७ मे रोजी नेहा ने पैसे भरुन रेटिंग देणेही सुरू केले. त्यानुसार त्या संकेतस्थळावरीलच आयडी मध्ये पैसे जमा झाल्याचे दिसत होते. मात्र, तत्काळ ते कमी होत होते. तिला दोन दिवसांनी पुन्हा एका एजंटने संपर्क साधत रक्कम मायनसमध्ये असल्याने २० हजार रुपये भरण्यास सांगितले. रेटिंगच्या कामात उणिवा सांगून पैसे कमी करत असल्याचेही सांगत गेले. नेहा त्यांच्या जाळ्यात अडकल गेली व तीन दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख रुपये उकळले. तिने याप्रकरणी पहिले सायबर पोलिसांकडे अर्ज केला. त्याच्या पाच महिन्यानंतर याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.