तिसऱ्या लाटेची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:02 AM2021-07-18T04:02:17+5:302021-07-18T04:02:17+5:30
जिल्ह्याची तयारी कुठे ? बालरोगतज्ज्ञांचा प्रश्न : यंत्रसामग्रीची खरेदी, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; पण कंत्राटी कर्मचारी केले कमी, पुन्हा ...
जिल्ह्याची तयारी कुठे ?
बालरोगतज्ज्ञांचा प्रश्न : यंत्रसामग्रीची खरेदी, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; पण कंत्राटी कर्मचारी केले कमी, पुन्हा करावी लागेल शोधाशाेध
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औरंगाबाद जिल्ह्यात एकाच वेळी १५ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तीनशेच्या घरात आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तरी उपचाराच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज असून, तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने अन्य सुविधाही उभ्या केल्या जात आहे.
त्यामुळे राज्यभरासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अक्षरश: कहर पाहायला मिळाला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दुप्पट रुग्णसंख्या वाढली. मृत्यूचे प्रमाणही वाढले. दुसरी लाट ओसरल्याने दिलासा व्यक्त होत नाही, तोच तिसऱ्या लाटेचे संकट उभे राहिले आहे. तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार बालकांच्या दृष्टीने उपचाराची यंत्रणा सज्ज केली जात आहे. तर दुसऱ्या लाटेत औरंगाबाद जिल्ह्यात रोज ५५ ते ६० टन ऑक्सिजन लागला. ऑक्सिजनच्या वाढलेल्या मागणीने आता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत फिजिशियन डाॅक्टरांची संख्या अपुरी पडली होती. त्याप्रमाणे तिसऱ्या लाटेत बालरोगतज्ज्ञांचा प्रश्न उभा राहण्याची भीती आहे. कंत्राटी डाॅक्टर, परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे. तिसरी लाट आली तर पुन्हा कर्मचाऱ्यांची शोधाशोध करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----
पहिली लाट
एकूण रुग्ण-४८,२६६
बरे झालेले रुग्ण-४६,९९८
मृत्यू -१,२६८
----
दुसरी लाट
एकूण रुग्ण-९८,६३४
बरे झालेले रुग्ण-९६,१२६
मृत्यू-२,२००
-------
७.३२ टक्के टक्के लोकांचेच पूर्ण लसीकरण
१८ वर्षांवरील एकूण लोकसंख्या-३२,८७,८१४
एकूण लसीकरण - ९,९९,०२०
पहिला डोस -७,५८,१२३
दोन्ही डोस - २,४०,८९७
-----
एक हजार ऑक्सिजन बेड
घाटी रुग्णालयात ऑक्सिजन बेडची एक हजार बेड तयार झाले आहेत. तर दीडशे आयसीयू बेड याठिकाणी सज्ज आहेत. जिल्हा रुग्णालयात आजघडीला ३०० खाटा आहेत. महापालिकेच्या मेल्ट्राॅनमध्ये रुग्णसेवेसाठी आवश्यक सोयी-सुविधा वाढविल्या जात आहेत.
लहान मुलांसाठी कोविड सेंटर
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यानुसार महापालिकेने पूर्वतयारी केली असून, विविध रुग्णालयांत मुलांच्या उपचारासाठी ७३६ बेडचे नियोजन करण्यात आले आहे. यात ४५ व्हेंटिलेटर आणि ४३७ ऑक्सिजन बेड राहणार आहेत. बालकांसाठी गरवारे कंपनीत बालकांसाठी १०० खाटांचे कोविड रुग्णालय आणि एमजीएम स्पोर्ट्स काॅम्प्लेक्समध्ये १०० खाटांचे कोविड सेंटर सज्ज होणार आहे.
------
ऑक्सिजन प्लांटची उभारणी
- घाटीत दोन ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आले आहे. महापालिका आणि जिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे.
- घाटीत पीएम केअर फंडातील प्रकल्पातून दिवसाला १०० लीटर प्रति मिनिटप्रमाणे २०० मोठे सिलिंडर इतका ऑक्सिजन तयार होत आहे.
- चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (सीएमआयए) घाटीत उभारण्यात आलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून दररोज १२५ जम्बो सिलिंडर इतकी ऑक्सिजन निर्मिती होत आहे.
--
तिसऱ्या लाटेची तयारी सुरू
तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने मनपा आणि घाटी रुग्णालयाला उपचारासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची खरेदी केली जाणार आहे. लहान मुलांसाठी आवश्यक असलेले व्हेंटिलेटरसह अन्य बाबींची खरेदी केली जाणार आहे. डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक