सिल्लोड तालुक्यातील ११२ शाळांची आजपासून वाजणार घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:02 AM2021-07-15T04:02:06+5:302021-07-15T04:02:06+5:30
सिल्लोड : तालुक्यातील ७० कोरोनामुक्त गावांतील आठवी ते बारावीच्या ११२ शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत. मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील ज्या ...
सिल्लोड : तालुक्यातील ७० कोरोनामुक्त गावांतील आठवी ते बारावीच्या ११२ शाळा गुरुवारपासून सुरू होणार आहेत.
मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील ज्या गावात शाळा चालू होणार आहेत, तेथील मुख्याध्यापकांची बैठक झाली. त्यात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश कोमटवार यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भावामुळे शाळांचे वर्ग प्रत्यक्षात सुरू होऊ शकले नाही. १६ मार्च २०२० पासून शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टप्प्यातील कोरोनामुक्त गावातील व ज्या गावात मागच्या महिनाभरापूर्वी एकही रुग्ण सापडला नाही, अशा गावांतील ८ ते १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग १५ जुलैपासून सुरू होत आहेत. यासाठी नियमावली निश्चित करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यासाठी ग्रा.पं. स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शालेय समिती अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी यांची ग्रामस्तरावर समिती निश्चित करण्यात आली आहे. समिती परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहे. सिल्लोड तालुक्यातील ७० गावातील ११२ शाळांनी शाळा सुरू करण्यास सहमती दाखविली आहे.
चौकट-
एका बाकावर एक विद्यार्थी.....
शिक्षण विभागाचे अधिकारी ग्राम पातळीवर जाऊन समितीच्या बैठका घेत आहेत. यात शाळेत सॅनिटायझर, थर्मल गण, ऑक्सिपल्स मीटरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची तपासणी, विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देताना घ्यावयाची काळजी, लस घेतलेले शिक्षक, मास्कचा वापर, एका बाकावर एक विद्यार्थी, वर्गात दोन विद्यार्थ्यांत सहा फुटांचे अंतर असे नियोजन असणार आहे.
चौकट....
कोणत्या केंद्रांतर्गत किती शाळा सुरू होणार
अजिंठा केंद्रात ४, अंभई ७, आमठाणा ७, अंधारी ४, केऱ्हाला २, भराडी ७, बोरगाव बाजार ३, निल्लोड ७, पालोद ५, पानवडोद ३, रहिमाबाद ५, शिवना ६, उंडणगाव ७, सिल्लोड ४ अशा एकूण ७० गावांत ११२ शाळा सुरू होणार आहेत.
कोट...
शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण
शिक्षण विभागामार्फत शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. ज्या शाळा सुरू होणार आहेत, त्या शाळांतील शिक्षकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.
- व्यंकटेश कोमटवार, शिक्षणाधिकारी, सिल्लोड.