लाडक्या बहिणी खूष, पण महागाईचं काय? महिलांच्या जाहीरनाम्यात महागाई, सुरक्षिततेबाबत चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 07:48 PM2024-10-19T19:48:54+5:302024-10-19T19:49:35+5:30
सरकारने महागाईला आळा घालण्यासाठी ठोस कारवाई करावी असा सूर महिलांमध्ये आढळून येत आहे.
छत्रपती संभाजनीगर : सध्या लाडक्या बहिणी खूष आहेत. ऐन दिवाळीत त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपयेप्रमाणे पैसे जमा होत आहेत. पण वाढत्या महागाईनंही या लाडक्या बहिणी तेवढ्याच त्रस्त आहेत. इकडे शासनाचे पैसे मिळत असल्याचा आनंद आहे. पण महागाईच्या भस्मासुरामुळे त्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेलाच आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. २३ ला निकाल कळेल. येणारे कोणते सरकार असेल, त्या सरकारने महागाईला आळा घालण्यासाठी ठोस कारवाई करावी असा सूर महिलांमध्ये आढळून येत आहे. नव्या सरकारकडून महिलांच्या काय आहेत अपेक्षा या अनुषंगाने जाणू घेतलेल्या या प्रतिक्रिया :
दिवाळी चांगली होऊन जाईल, पण....
नोव्हेंबर महिन्याचे पैसेही लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. त्यामुळे दिवाळी चांगली होऊन जाईल. पण महागाईसारखा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहेच. ही महागाई कमी करण्यावर येणाऱ्या सरकारने भर द्यायला हवा. गॅसचे वाढलेले दर तरी कमी व्हायला पाहिजे. आज सर्वच बाबतीत महागाई वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.
- रोहिणी शेवाळे, सामाजिक कार्यकर्त्या
महिलांना आत्मसन्मानाने जगता आलं पाहिजे
महिलांना आत्मसन्मानाने जगता आलं पाहिजे. संविधानाने तिला दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली होऊ देता कामा नये, हे माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. शिवाय महिलांच्या आरोग्याचा व रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने हाताळणारे सरकार असावे. एका अहवालात छत्रपती संभाजीनगर महिलांच्या दृष्टीने अत्यंत असुरक्षित असल्याचे दिसून आले. २० ऑक्टोबर रोजी महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करून जाहीरनामा तयार करण्यासाठी सजग महिला संघर्ष समितीची दुपारी १२:३० वा. एमआयटीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
- मंगल खिंवसरा, विद्रोही सामाजिक कार्यकर्त्या.
बलात्कार करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यावी
शिव- फुले-शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली महिला असुरक्षित आहे. नराधमांच्या तावडीतून आता चिमुकल्या मुलीही सुटेनात. महिलांवर अन्याय- अत्याचार वा बलात्कार करणाऱ्यांना भर चौकात फाशी झाली पाहिजे. असं काही तरी करणारं सरकार असायला हवं, असं मला वाटतं. लाडक्या बहिणींना आता दीड हजार रु. मिळायला लागलेत, पण पैसे देणारे भाऊ स्वार्थी आहेत, ते कशासाठी पैसे देत आहेत, हे त्या ओळखून आहेत. देत आहेत, तर घेऊन टाका ही त्यांची भूमिका दिसते.
- कांचन सदाशिवे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या.
मूलभूत गरजा पूर्ण करणारं सरकार हवं...
हल्ली जातीपातीचं राजकारण खूप वाढलंय. ते थांबलं पाहिजे. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारं सरकार असावं असं मला वाटतं. विशेषत: महिलांच्या संरक्षणाचा फार मोठा मुद्दा आहे. महिलांना मान द्यायलाच पाहिजे. मात्र आजही तिच्यावर अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. हे वेळीच थांबवणारं सरकार हवं. आता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळायला लागले, म्हणून त्या खुश आहेत. पण ज्यांना काही मिळालेलं नाही, त्या दोडक्या बहिणींचं काय? आणि कुणी काही दिलं तर घेऊन टाकलं जातं; पण महिलांचे अन्य प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत.
- क्रांती कुलकर्णी-देशमुख, निवृत्त मनपा शिक्षिका
कष्टकरी कामगार महिलांनाही हवाय न्याय...
महिलांची सुरक्षा हा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. कष्टकरी कामगार महिलांची पिळवणूक थांबवली गेली पाहिजे. ती जिथे काम करते, तेथे ती मानसिक, शारीरिक छळाला बळी पडते. उमेद अभियान, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी या महिलांचे प्रश्न सुटता सुटत नाहीत. दुसरीकडे महागाईने या महिला होरपळून निघत आहेत. त्यांच्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करून भरघोस मदत दिली गेली पाहिजे. एकीकडे लाडक्या बहिणी सरकारचे दीड हजार रुपये आनंदाने घेत आहेत, पण लगेच महागाई वाढत असल्याने त्या पुरत्या होरपळल्या जात आहेत. हे प्रश्न सरकारने सोडवले पाहिजेत.
- कॉ. मंगल ठोंबरे, कामगार नेत्या
अडगळीतल्या रस्त्यांवरही कॅमेरे बसवा.....
महिलांच्या सुरक्षिततेबद्दल खूप चिंताजनक परिस्थिती आहे. मी शिकायला विदेशात होते. तिथं अडगळीतल्या रस्त्यांवरही डिव्हाइसची सोय असायची. सायरन वाजायचा. तशी सोय आपल्याकडेही व्हायला हवी. वर्किंग वुमेनला अजून सुरक्षितता द्यायला हवी. तिला रात्री घरापर्यंत पोहचवण्याची सोय केली गेली पाहिजे. बस, रेल्वेमध्ये अधिक आरक्षण मिळायला हवे. संविधानाने दिलेला ‘इक्वल पे फॉर इक्वल वर्क’ हे सूत्र तंतोतंतपणे अंमलात यायला हवे.
- ॲड. ममता झाल्टे, विधिज्ञ, जिल्हा कोर्ट