छत्रपती संभाजीनगरात बेनामी ५० लाखांची रक्कम जप्त; आठवड्याभरात दुसऱ्यांदा कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 12:34 PM2024-05-18T12:34:42+5:302024-05-18T12:35:35+5:30
छत्रपती संभाजीनगरात बेनामी रक्कम येते कोठून? रक्कमेसह सराफा पिता-पुत्र ताब्यात, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : आठवड्याभरात दुसऱ्यांदा पोलिसांनी सिल्लेखाना परिसरात बेहिशेबी ५० लाख रुपयांची राेख रक्कम घेऊन जाणाऱ्या सराफा व्यावसायिक पिता पुत्राला अटक केली. अर्जुन भास्कर मुंडलिक (५०) व सिद्धेश अर्जुन मुंडलिक (२३, रा. तापडियानगर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांचे पानदरिबा परिसरात दागिन्यांचे दुकान आहे.
सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांना शुक्रवारी दुपारी सिल्लेखाना परिसरातून दुचाकीवरून दोघे बेनामी रकमेची वाहतूक करणार असल्याचे समजले. उपायुक्त नितीन बगाटे यांच्या सूचनेवरून शिंदे यांनी २ वाजता सिल्लेखाना चौकात साध्या वेशात पथकासह सापळा रचला. सिद्धेश दुचाकी चालवत येताच पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. घटनास्थळी दोघांनी उत्तर देण्यास नकार दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेण्यात आले. उपनिरीक्षक अर्जुन कदम, इरफान खान, जफर पठाण, निवृत्ती गोरे, सतीश जाधव, अर्जुन जिवडे, दत्तात्रय दुभाळकर यांनी कारवाई पार पाडली.
उत्तरे देण्यास नकार
पोलिसांनी बापलेकांची कसून चाैकशी केली. मात्र, दोघांनी उत्तरे दिली नाहीत. सायंकाळपर्यंत त्यांनी पुरेसे पुरावे सादर न केल्याने त्यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक देविदास शेवाळे अधिक तपास करत आहेत.
आयकर विभागाकडे तपास
११ मे राेजी उपायुक्त बगाटे यांनी पैठण गेट येथील एस.एस. मोबाईल ॲक्सेसरीजच्या दुकानातून बेहिशेबी ३९ लाख रुपये जप्त केले होते. त्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सदर रक्कम व कागदपत्रे पोलिसांनी आयकर विभागाकडे सुपुर्द केली. आयकर विभाग या रकमेविषयी तपास करेल, असे उपायुक्त बगाटे यांनी सांगितले.