गळ टोचून घेणाऱ्या भाविकावर गुन्हा दाखल करून पोलीस आणि देवस्थान न्यासाला सहआरोपी करण्याचा खंडपीठाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:06 PM2019-04-24T23:06:39+5:302019-04-24T23:07:12+5:30
शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील भक्तांच्या पाठीत गळ टोचण्याच्या स्थळावर पोलीस निरीक्षक दर्जाच्या एक किंवा अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. पुढील दोन दिवसांत यात्रेत गळ टोचून घेणाºया भक्तांवर ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत’ गुन्हा नोंदवावा. तसेच गळ टोचून घेताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे गृहित धरुन पोलीस आणि देवस्थान न्यासाला (ट्रस्टला) सहआरोपी करावे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. नितीन. डब्ल्यू. सांबरे यांनी बुधवारी (दि.२४ ) दिला.
औरंगाबाद : शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील भक्तांच्या पाठीत गळ टोचण्याच्या स्थळावर पोलीस निरीक्षक दर्जाच्या एक किंवा अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. पुढील दोन दिवसांत यात्रेत गळ टोचून घेणाºया भक्तांवर ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत’ गुन्हा नोंदवावा. तसेच गळ टोचून घेताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे गृहित धरुन पोलीस आणि देवस्थान न्यासाला (ट्रस्टला) सहआरोपी करावे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. नितीन. डब्ल्यू. सांबरे यांनी बुधवारी (दि.२४ ) दिला.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात खंडपीठात अहवाल सादर करावा. याचिकाकर्त्याच्या वकिलांनीही यात्रेदरम्यान गळ टोचण्याचे कृत्य होते का याकडे लक्ष द्यावे, असेही आदेशात म्हटले असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले. याचिकेवर शुक्रवारी (दि.२६) सुनावणी होणार आहे.
लाल सेनेचे अध्यक्ष गणपत भिसे यांनी अॅड. अंगद कानडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. शेंद्रा येथे दरवर्षी लाखो भाविक मांगीरबाबाला बोललेले नवस फेडण्यासाठी कोंबडे, बकºयांचा बळी देतात व स्वत:च्या पाठीत लोखंडी गळ (हूक) टोचून घेण्यासारखे अघोरी प्रकार करतात. या अनिष्ट प्रथेमुळे आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे अनेक भक्तांना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे लाल सेनेने या प्रथेविरुद्ध संस्थापक अध्यक्ष गणपत देवराव भिसे यांनी बेमुदत उपोषणही केले होते. प्रथा बंद होण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मांगीरबाबा देवस्थान ट्रस्ट यांच्याकडेही मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही गतवर्षी हजारो भाविकांनी अंगात लोखंडी गळ टोचून घेऊन नवस फेडले होते.
याचिकेच्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या अनुसूची ३ प्रमाणे स्वत:च्या अंगाला इजा करणे बेकायदेशीर असून, ही अनिष्ट प्रथा लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.