नाथ वंशज रघुनाथबुवा पालखीवाले यांना सालपाळी देण्याचा खंडपीठाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:05 AM2021-06-26T04:05:22+5:302021-06-26T04:05:22+5:30
औरंगाबाद : पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानचे गावातील आणि गोदावरी नदी काठावरील ...
औरंगाबाद : पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानचे गावातील आणि गोदावरी नदी काठावरील मंदिर यांचे २०२१ ते २०२२ दरम्यानचे सालाना व्यवस्थापन (सालपाळी), पूजाअर्चा तसेच इतर अधिकार २८ जून २०२१ रोजी रघुनाथ बुवा पालखीवाले यांना देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा व्ही. कंकणवाडी यांनी गुरुवारी (२४ जून) इतर नाथ वंशजांना दिला आहे.
सन २०२१च्या नाथषष्ठीनंतर मिळणाऱ्या सालपाळीपासून इतर नाथ वंशजांनी आपल्याला परावृत्त केले आहे, असे नाथ वंशज रघुनाथबुवा पालखीवाले यांनी म्हटले होते. उच्च न्यायालयाने हे अधिकार वेळोवेळी अबाधित ठेवले असल्यामुळे आपल्याला दोन्ही मंदिरांची सालपाळी देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित याचिकेत दिवाणी अर्ज दाखल करून पालखीवाले यांनी केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे. या आदेशामुळे पालखीवाले यांचा १ जुलै २०२१ रोजी संत एकनाथ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. रघुनाथबुवा पालखीवाले यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ विनायक ज. दीक्षित यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. आशुतोष कुलकर्णी आणि ॲड. सुशांत दीक्षित यांनी सहकार्य केले.