लातूर येथील कल्पना गिरी खून खटल्यातील आरोपीचा जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:13 PM2019-07-02T13:13:31+5:302019-07-02T13:17:12+5:30
राजकीय कार्यकर्ती कल्पना गिरी खून खटल्यातील आरोपी समीर नूरमिया किल्लारीकरला जामीन फेटाळला
औरंगाबाद : लातूर येथील राजकीय कार्यकर्ती कल्पना गिरी खून खटल्यातील आरोपी समीर नूरमिया किल्लारीकर याचा नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी फेटाळला. हा खून खटला १८ महिन्यांच्या आत निकाली काढण्याचे आदेश खंडपीठाने लातूरच्या सत्र न्यायालयाला दिले.
कल्पना गिरी ही २२ मार्च २०१४ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने दिली होती. २३ मार्चला कल्पनाचा मृतदेह तुळजापूर तलावाजवळ आढळला होता. पोलिसांनी या खून खटल्यात समीरसह इतर आरोपींना अटक केली होती. समीरला २९ मार्च २०१४ ला अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, त्यानंतर या खटल्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असून, त्यांनी अद्यापपर्यंत दोषारोपपत्र दाखल केले नाही. यापूर्वी समीरचा जामीन अर्ज सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांनी फेटाळले आहेत. पुन्हा समीरने सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. खंडपीठाने समीरचा जामीन अर्ज फेटाळून सत्र न्यायालयाला वरीलप्रमाणे आदेश दिले.