जनहितैषी चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:07 PM2018-01-23T18:07:14+5:302018-01-23T18:09:55+5:30

बुकशेल्फ : ‘समाजपरिवर्तनाच्या दिशेने’ हे, प्रगत आणि प्रगल्भ मानसिकतेचे धनी असलेले विचारवंत, लेखक अ‍ॅड. डी.आर. शेळके यांनी यथास्थित लिहिलेल्या चौपन्न लेखांचे ग्रंथस्वरूप संकलन आहे.

beneficial philosophy | जनहितैषी चिंतन

जनहितैषी चिंतन

googlenewsNext

- डॉ. बलभीमराज गोरे

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांची या ग्रंथास अत्यंत अभ्यासपूर्ण, समर्पक तथा प्रशस्त आणि म्हणूनच प्रतिष्ठापूर्ण अशी प्रस्तावना लाभलेली आहे. ग्रंथातील एकूण एक विषय वस्तूच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेला सार-स्वरूप परामर्श निश्चितच विचारणीय आहे. प्रस्तावनेतील अक्षर-अक्षरांतून त्यांनी घेतलेल्या कष्टांची प्रचीती येते.

ग्रंथातून लेखक या नात्याने माजी न्यायाधीश डी.आर. शेळके यांनी व्यक्त केलेले मनोगत, सोपस्काराचाच एक भाग असले, तरी ते लेखकाचा उपजत पिंड जाणून घेण्याच्या दृष्टीने तसेच लेखांतून त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांच्या मुळातील भूमिकेस समजून घेण्याच्या दृष्टीने पूरक आहे. आपण आधी मराठा सेवा संघाचे काम केले आहे; पण हल्ली आपण सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय असल्याचे विनम्र तथा प्रामाणिक विधान म्हणजे लेखकाने, स्वत:हून कबूल केलेला आपल्या रूढ विचारसणीतील ‘यू-टर्न ’ आहे. एक व्यक्ती या नात्याने ज्या लेखकाच्या मनावर महात्मा फुले यांच्या विचारांचा सखोल प्रभाव आहे आणि ज्या लेखकास साक्षात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सान्निध्य लाभले आहे, त्यांच्या विचारसरणीत उल्लेखित ‘यू-टर्न’ आला नसता तरच नवल!...

या ‘यू-टर्न’मुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे ती ही की, आपल्या ग्रंथातून अ‍ॅड. शेळके यांनी जे चौपन्न लेख संकलित केले आहेत त्या सर्वच्या सर्व लेखांची प्रकृती आणि ती मधील पोटतिडीक लगेच दिसू लागते, तिचे आकलन होते आणि ते काळजाला भिडते. कारण वाचकांना ती संभ्रमात टाकीत नाही. शिवाय प्रत्येक लेखाचे मथळे इतके सुस्पष्ट आहेत की, जणू ते लेखकाचे अंतिम वक्तव्य वाटावेत. मथळ्यांचे आशय-विषय एक-दुसर्‍याच्या तुलनेत कितीही भिन्न असले तरी अंततोगत्व : लेखकाने, ‘माणूस’ आणि समाजजीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रांतील बहुतेक सर्व प्रश्नांना ज्या-त्यावेळी मोठ्या धाडसाने ऐरणीवर घेण्याचे काम केले आहे. लेख परखड असले तरी त्यातील मांडणी समतोल व विवेकनिष्ठ आहे. ‘समाजपरिवर्तनाच्या दिशेने’ या ग्रंथात सामान्यत: अकरा लेख असे आहेत की, ज्यांना निक्षून सामाजिक पृष्ठभूमी आहे. सात लेख काहीसे राजकीय स्वरूपाचे, सात प्रबोधनात्मक, बारा वैचारिक, तर सतरा नितांत संवेदनशील असे विषय आहेत.

सर्व लेख सर्व स्तरांतील आणि सर्व जाती-धर्मांतील समाजासाठी वाचनीय आहेत; पण त्यातून व्यक्ती आणि समाजजीवनात अशात जे काही चालले आहे त्यासंबंधी लेखक स्वत:च्या ठिकाणी गंभीर आहे. यामुळेच तो असमाधानी आहे आणि मननशील परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे. लेखक अ‍ॅड. डी.आर. शेळके हे कायद्याचे अभ्यासक असण्याबरोबरच व्यापक जनहितैषी असल्यामुळे त्यांच्यातील लेखनसामर्थ्य आणि तर्कबुद्धीला चांगलाच दुजोरा आणि बळकटी मिळत गेली आहे. पुस्तक मन:पूर्वक वाचून झाल्यानंतर अनेकांची विचार करण्याची दिशा बदलावी, निश्चितच या ताकदीचा हा लेखन प्रपंच आहे.

Web Title: beneficial philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.