तनवाणींची माघार अन् २४ तास सर्वसामान्यांच्या सुख दु:खात धावून जाण्याचा फायदा: प्रदीप जैस्वाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:55 PM2024-11-14T12:55:03+5:302024-11-14T13:08:43+5:30
२४ तास सर्वसामान्यांमध्ये राहणारा मी आहे. सुख-दु:खात धावून जातो. त्यामुळे मला सर्वच समाजाचा पाठिंबा मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचा मागील काही वर्षांमध्ये सर्वांगीण विकास केला. ज्या वसाहतींमध्ये नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात चिखलातून ये-जा करावी लागत होती, तेथे दर्जेदार सिमेंट रस्ते दिले. ड्रेनेजलाइन आदी कामे केली. २४ तास सर्वसामान्यांमध्ये राहणारा मी आहे. सुख-दु:खात धावून जातो. त्यामुळे मला सर्वच समाजाचा पाठिंबा मिळत आहे. किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतली ही माझ्यासाठी मोठी बाब असून, त्याचा फायदाच होईल, असे मत शिंदेसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
प्रश्न : निवडणुकीत तुमच्या विरोधात तनवाणी नसल्याने फायदा होईल का?
उत्तर : निश्चितच फायदा होईल. मतविभाजन टाळण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी मला पाठिंबाही दर्शविला असून, लवकरच ते उघडपणे माझ्यासाठी प्रचारही करणार आहेत.
प्रश्न : विजयाचा तुम्हाला किती टक्के विश्वास वाटतो?
उत्तर : २०० टक्के मतदार माझ्या बाजूनेच कौल देतील. सर्वसामान्य, विद्यार्थी, महिला, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी आजपर्यंत मी काम करीत आलोय. सर्वसामान्यांशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे.
प्रश्न : मतदारसंघातील कोणतेही एक मोठे काम सांगा?
उत्तर : मागील पाच वर्षांत स्वत:चा निधी, शासनाकडून प्राप्त झालेला विशेष निधी मोठ्या प्रमाणात आणला. विकास काय असतो, हे मी दाखवून दिले. नागरिक माझ्या कामावर खूश आहेत.
प्रश्न : महायुतीमधील घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते सोबत आहेत का?
उत्तर : प्रश्नच नाही. शिंदेसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते महायुती बळकट करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.