बलुतेदारांना नव्या आर्थिक वर्षातच ‘पीएम विश्वकर्मा’चा लाभ? योजनेची लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता
By विजय सरवदे | Published: December 22, 2023 02:29 PM2023-12-22T14:29:15+5:302023-12-22T14:29:44+5:30
तीन महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी बलुतेदारांमधील १८ घटकांसाठी ही योजना जाहीर केली.
छत्रपती संभाजीनगर : बारा बलुतेदारांमधील पारंपरिक कारागिरांचे कौशल्य टिकावे व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून पहिल्यांदाच अमलात आलेल्या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी या योजनेसाठी प्रथम सरपंचांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे या योजनेचा प्रत्यक्ष लाभ नवीन आर्थिक वर्षातच होईल, अशी शक्यता आहे.
तीन महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी बलुतेदारांमधील १८ घटकांसाठी ही योजना जाहीर केली. जिल्ह्यात सध्या या योजनेसाठी ‘पीएम विश्वकर्मा’ या पोर्टलवर सरपंचांची नोंदणी करून घेतली जात आहे. ८७० पैकी आतापर्यंत १६० सरपंचांची नोंदणी झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सरपंचांच्या नोंदणी पूर्ण करण्याचा जिल्हा परिषद पंचायत विभागाचा मानस आहे. त्यानंतरच लाभार्थ्यांना या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कारागिरांचे लक्ष या योजनेसाठी अर्ज करण्याकडे लागले आहे.
कौशल्य विकास विभागाकडून सरपंचांच्या नोंदणीस मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना या विभागाकडून लॉगिन आयडी व पासवर्ड मिळेल. त्यानंतर लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तो अर्ज सरपंचांच्या लॉगिनला जाईल. सरपंचांनी लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ते पुढे कौशल्य विकास विभागाकडे फॉरवर्ड करतील. या विभागाने अर्जाची पडताळणी करून मंजुरी दिल्यानंतर निवडलेल्या लाभार्थ्यांना ५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणात सहभागी लाभार्थ्यांना प्रतिदिन ५०० रुपयांचे विद्यावेतन, पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, तसेच व्यवसायासाठी साधने घेण्यासाठी (टूल किट) १५ हजार रुपयांचे कार्ड दिले जाणार आहे.
कोणाला मिळणार योजनेचा लाभ
या योजनेंतर्गत सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, गटई कामगार, सुर्वणकार, शिंपी, गवंडी, धोबी, चावी बनविणारे, विणकर, दोरी वळणारे, मासेमारीचे जाळे बनविणारे, शिल्पकार (मूर्ती बनविणारे) या बारा बलुतेदारांतील १८ घटकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अल्पदारात कर्जाची तरतूद
प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना अवघ्या ५ टक्के व्याजदरात कोणत्याही हमीशिवाय, विना तारण बँकांकडून कर्जदेखील मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांचे कर्ज १८ महिन्यांत फेडणाऱ्यास दुसऱ्या टप्प्यात २ लाखांचे कर्ज मिळणार आहे. २ लाखांच्या कर्ज परतफेडीसाठी ३० महिन्यांचा कालावधी असेल.