बंगाली महिलांनी लुटला सिंदुर खेळाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 07:22 PM2018-10-19T19:22:51+5:302018-10-19T19:23:24+5:30
बजाजनगरात बंगाली असोसिएशनच्यातर्फे आयोजित श्री श्री दुर्गा पुजा महोत्सवाची शुक्रवारी उत्साहात सांगता करण्यात आली. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी बंगाली महिलांनी गाणी गात, धम्माल नृत्य करीत व एकमेकींना सिंदूर लावत पांरपारिक पद्धतीने या सणाचा मनमुराद आनंद लुटला.
वाळूज महानगर: बजाजनगरात बंगाली असोसिएशनच्यातर्फे आयोजित श्री श्री दुर्गा पुजा महोत्सवाची शुक्रवारी उत्साहात सांगता करण्यात आली. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी बंगाली महिलांनी गाणी गात, धम्माल नृत्य करीत व एकमेकींना सिंदूर लावत पांरपारिक पद्धतीने या सणाचा मनमुराद आनंद लुटला.
बंगाली असोसिएशनच्यावतीने दरवर्षी बजाजनगरातील चिंचबन कॉलनीत दुर्गा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा १५ आॅक्टोबरपासून या दुर्गा उत्सवाला सुरवात करण्यात आली होती.
या महोत्सवात पाच दिवस चाललेल्या शष्ठी, महासप्तमी, महाआष्टमी, संधी पुजा, बलीदान, महानवमी, विजयादशमी आदी धार्मिक कार्यक्रमाला बंगाली समाज बांधव व परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शुक्रवारी समाज बांधवाच्यावतीने भक्तीपूर्ण व प्रसन्न वातावरणात श्री दुर्गा मातेची पारंपारीक पद्धतीने पूजा करण्यात आली. यानंतर बंगाली महिलांनी श्री दुर्गा मातेला मिठाईचे नैवद्य भरवून तसेच तिला सिंदूर लावत दर्शन घेतले. यावेळी पूजा व धार्मिक कार्यक्रमानंतर बंगाली महिलांनी एकमेकींना सिंदूर लावत उत्सव साजरा केला.
कार्यक्रमात बंगाली समाज बांधव व महिलांनी धमाल नृत्य करीत उपस्थितांचे लक्ष वेधुन घेतले होते. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी बंगाली महिलांनी आकर्षक पद्धतीने वेशभुषा परिधान करुन हिंदी व बंगाली भाषेतील सदाबहार गाणी गात गाजलेल्या गितावर बेधुंद होऊन थिरकत नृत्य केले. बंगाली महिलांचा सिंदूर खेळण्याचा कार्यक्रम बघण्यासाठी बजाजनगरातील आबाल-वृध्दांनी गर्दी केली होती.
यावेळी गाणी गात व नृत्य करीत लाल रंगाच्या सिंदुरने न्हावून निघालेल्या बंगाली महिलांनी ‘सेल्फी’ काढत या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. या उत्सव यशस्वीतेसाठी बंगाली असोसिएशनच्यावतीने पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.