यंदाच्या अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवात झळकणार ६० चित्रपट, जावेद अख्तरांची प्रकट मुलाखत
By बापू सोळुंके | Published: December 18, 2023 01:35 PM2023-12-18T13:35:48+5:302023-12-18T13:36:32+5:30
यासोबतच मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट ६० चित्रपट पाहण्याची संधी ९ व्या अजिंठा, वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शहरवासीयांना मिळणार आहे. हा महोत्सव ३ ते ७ जानेवारीदरम्यान शहरातील प्रोझोन मॉलमधील आयनाॅक्स थिएटरमध्ये होत असल्याची घोषणा संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आणि महोत्सवाचे संचालक अशोक राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राणे म्हणाले की, नाथ ग्रुप, एमजीएम, यशवंतराव चव्हाण सेंटर, मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशनने महाराष्ट्र सरकारच्या मदतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. जगाच्या नकाशावर ऐतिहासिक असलेल्या आपल्या शहराचे नाव चित्रपट निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून जागतिक पातळीवर यावे. मराठी चित्रपट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा हा चित्रपट महोत्सवाचा उद्देश आहे. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता एमजीएमच्या रुक्मिणी हॉलमध्ये महोत्सवाचे उद्घाटन सिनेदिग्दर्शक आर. बल्की यांच्या हस्ते होईल.
यावेळी सिने दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती असेल. एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असेल. या महोत्सवात भारतीय भाषांतील नऊ सिनेमांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ६० चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत निवडलेल्या सर्वोत्कृष्ट लघुपटाला २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा ५ जानेवारी रोजी मास्टर क्लास हाेईल. केंद्रीय सूचना व प्रसारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश मगदुम यांचे ६ रोजी दुपारी २:३० वाजता व्याख्यान होईल. ‘मीट द डिरेक्टर्स’ या सत्रात ६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता विविध दिग्दर्शकांसोबत संवाद होईल. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक ध्रृतीमान चॅटर्जी यांच्या मृणाल सेन समजून घेताना या विषयावर ७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता व्याख्यान होईल.
जावेद अख्तर यांना पद्मपाणी पुरस्कार प्रदान
सुप्रसिद्ध गीतकर पद्मश्री जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी पुरस्कार ३ जानेवारी रोजी सायंकाळी प्रदान करण्यात येणार आहे. पद्मश्री जावेद अख्तर यांची ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता प्रोझोन मॉलमध्ये प्रकट मुलाखत होणार आहे.