१००० बिघा जमिनीवर २०० वर्षांपूर्वी वसले ‘बेथेल’; आजही आहे केवळ ख्रिस्ती लोकांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 09:01 AM2019-12-25T09:01:57+5:302019-12-25T09:01:57+5:30
ख्रिस्तांचे जन्मगाव ‘बेथलहेम’वरून ठेवले गेले गावाचे नाव
- प्रभुदास पाटोळे
औरंगाबाद : येशू ख्रिस्तांचा जन्म पॅलेस्टाईन देशातील गालिल प्रांतामधील ‘बेथलहेम’ गावी झाल्याचे मानले जाते. त्यामुळे जगभरात ‘बेथलेहेम’ हे गाव सर्वश्रुत आहे. याच नावाशी साधर्म्य असलेले केवळ ख्रिस्ती लोकांसाठीच तत्कालीन मिशनरींनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी वसवलेले ‘बेथेल’ गाव पूर्वीच्या औरंगाबाद जिल्ह्यात आणि आताच्या जालना जिल्ह्यात आहे.
विशेष म्हणजे सुमारे दोन हजार लोकवस्ती असलेल्या या गावात आजही कोणीही ख्रिस्तेतर नाही. गावात दोनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या चर्चशिवाय अन्य कोणत्याही धर्माचे प्रार्थनास्थळ नाही. येथे केवळ ख्रिस्ती सणच साजरे होतात. विशेष म्हणजे निजाम सरकारकडून एक हजार बिघा जमीन मिळवून ‘बेथेल’ गाव वसविणारे जन्मत: ब्राह्मण असलेले मिशनरी डॉ. नारायण गोविंद शेषाद्री हे मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे रहिवासी होते. नारायण यांचे १८३६ च्या सुमारास पुणे येथील स्कॉटिश मिशन शाळेत शिक्षण झाले.
१३ सप्टेंबर १८४३ साली त्यांनी विधीवत ख्रिस्ती धर्म स्वीकारून १८५१ सालापासून धर्मोपदेशक म्हणून काम सुरू केले. १८६६ साली त्यांची जालन्याला बदली झाली. त्यांनी अनेकांना ख्रिस्ती धर्माचा बाप्तीस्मा दिला. या नव्याने ख्रिस्ती झालेल्यांसाठी गाव वसविण्याचे डॉ. शेषाद्री यांनी ठरविले. जालन्यापासून पाच-सहा कि.मी. अंतरावर पुरेशी जागा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
निजामाच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट सर रिचर्ड टेंपल मुंबईला आले असताना काही मिशनरींसोबत डॉ. शेषाद्री यांनी त्यांची भेट घेऊन जालन्याजवळील जमीन मिळण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ. शेषाद्री यांनी हैदराबादला जाऊन निजामाचे दिवाण सालारजंग यांची भेट घेऊन ४०० बिघा जमीन गाव वसवण्यासाठी आणि ६०० बिघा जमीन गावातील लोकांना कसण्यासाठी, अशी एकूण १००० बिघा जमीन शेतसारा सरकारकडे जमा करण्याच्या अटीवर मिळविली.
डॉ. शेषाद्री यांनी मिशन कमिटीकडून आलेले पैसे आणि स्वत: उभारलेल्या कर्जातून गाव वसविले. तेथे एक भव्य चर्च (सियोन चर्च) बांधले, जे आजही सुस्थितीत आहे. चर्चमध्ये सध्या रेव्ह. एस.एस. खंडागळे कार्यरत आहेत. गावात दोन शाळा सुरू करून त्यांना अनुक्रमे ‘सालारजंग’ आणि नवाब बहादूर’ अशी नावे दिली. शिवाय ग्रामस्थांना आणि तेथून जाणाऱ्यांच्या उपयोगासाठी मोठी विहीर बांधली. त्यातून आजही गावाला पाणीपुरवठा होतो. याच गावात डॉ. शेषाद्री यांची कबर आहे.
मराठवाड्यातील एकमेव गाव
‘बेथेल’ हे १०० टक्के ख्रिस्ती लोकांची वस्ती असलेले केवळ जालना जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यातील एकमेव गाव आहे. आतापर्यंत आपले वेगळेपण अबाधित ठेवलेले हे गाव जालना शहरापासून पाच ते सात कि.मी. अंतरावर आहे. नवीन शासकीय योजनांमुळे जालना शहराचा विस्तार होत असून, त्याची हद्द बेथेलपर्यंत पोहोचली आहे. यामुळे येथे आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. गावात केवळ ख्रिस्तीबांधवच असल्यामुळे हे गाव ‘ऐक्य, सेवा आणि साक्ष’ यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. येथील मंडळींची पास्टोरेट कमिटी, महिला मंडळ, तरुण संघ धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. ‘बेथेल’ हा इब्री शब्द आहे. त्याचा अर्थ ‘देवाचे घर’ होतो. हे नाव मंडळीने सार्थ केले असल्याची प्रतिक्रिया उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळाच्या मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. एम.यू. कसाब यांनी दिली.