सर्व काही देऊनही विश्वासघात, गद्दारी

By Admin | Published: June 18, 2017 12:42 AM2017-06-18T00:42:16+5:302017-06-18T00:43:35+5:30

बीड : त्यांना आमदार केलं, मंत्रीपद दिलं, खासदारकीची उमेदवारी दिली, मात्र काहींनी विश्वासघात केला, अशा शब्दात अजित पवार यांनी सुरेश धस यांना टोला लगावला.

Betrayal, betrayal, but not everything | सर्व काही देऊनही विश्वासघात, गद्दारी

सर्व काही देऊनही विश्वासघात, गद्दारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : त्यांना आमदार केलं, मंत्रीपद दिलं, खासदारकीची उमेदवारी दिली, मात्र काहींनी विश्वासघात केला, गद्दारी केली, नीचपणा केला अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माजी मंत्री सुरेश धस यांना टोला लगावला.
व्यासपीठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री प्रकाश सोळंके, आ. अमरसिंह पंडित, संग्राम कोलते, माजी आ. उषा ठोंबरे, सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते.
स्व. काकूंचा संदर्भ देत पवार यांनी चांगला मेसेज जावा हीच भावना असल्याचे सप्ष्ट केले. काळ बदलतोय, जनरेशन गॅप वाढला आहे, संदीप व बाकीचे बरोबर राहावे ही भूमिका होती. जि. प., न. प. निवडणुकीत मार्ग काढण्याचा प्रयत्न झाल्याचे पवार म्हणाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजकारणात सर्व गोष्टी कशा घडल्या याचं चिंतन करणे गरजेचे आहे असे पवार म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
धनंजय मुंडे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. तरूण, उमदे नेतृत्व वाढवा असे बोलत पवार यांनी संदीप क्षीरसागर यांचा नामोल्लेख करत सूचक संकेत दिले. सरकार आपलं नसलं तरी प्रयत्न ठेवा, यश मिळतं हे परळीवरुन लक्षात घ्या. जि. प. मध्ये जागा जास्त, मार्केट कमिटी आपल्याच ताब्यात. असेच काम इतर मतदार संघात व्हावे. उद्याचा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करा, राष्ट्रवादीचे सरकार आणण्यासाठी काम करा, असा सल्ला देतानाच जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांचा नामोल्लेख करत एकजुटीने एकोप्याने काम करा, जिवाचे रान करा असे आवाहन पवार यांनी या वेळी केले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, सत्तेमध्ये चढउतार होत असतात, परंतु, सत्ता गेल्यानंतर काही सत्तापिपासू दूर जातात, असा टोला बंडखोरांना लगावत जोपर्यंत पवार साहेबांच्या विचाराशी जोपर्यंत आमची नाळ जुळली आहे, तोपर्यंत काही फरक पडणार नाही असे ते म्हणाले.
जुलैमध्ये राजकीय भूकंप, यावर तटकरे म्हणाले, शिवसेनेला भाकिते करायची सवय आहे. भूकंप झाला आणि निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी शंभर टक्के यश मिळवील असा दावा तटकरे यांनी केला. निष्ठावंत, संकटकाळात सोबत राहणाऱ्या कार्यकर्त्याला पद, सन्मान देण्याची पक्षाची भूमिका आहे. शाहू- फुलेंचा महाराष्ट्र सांभाळायचा असेल तर अजितदादांनी नेतृत्व केलं पाहिजे असे मत व्यक्त करताना राजकीय परिवर्तनाची सुरुवात बीड जिल्ह्यापासून करा असे आवाहन तटकरे यांनी केले.
या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, या मेळाव्यामुळे उत्साह संचारला असून २००९ व २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांचा उल्लेख करत आगामी निवडणुकीत सहापैकी सहा जागा राष्ट्रवादीला मिळतील, असा शब्द मुंडे यांनी या वेळी श्रेष्ठींना दिला. जि.प. निवडणुकीत भाजपला १९ पेक्षा जास्त जागा आणता आल्या नाही, राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी विश्वास दिला परंतु, दुर्दैवाने यश टिकविता आले नाही. परंतु, आता पुर्वीप्रमाणे तक्रारी येणार नाहीत, वाट आणि वहिवाट एकच राहील, अशी ग्वाही देत पवारांनी बीड जिल्ह्यावर प्रेम केले, अनेक संधी दिल्या. स्वाभिमानासाठी राष्ट्रवादी मजबूत करायची आहे. मग लाटेचा फरक पडणार नाही असेही मुंडे म्हणाले.
रेखा फड जिल्हाध्यक्ष,
हेमा पिंपळे प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराच्या घटनांवर भाष्य करत सुरक्षेची गंभीर समस्या असल्याचे सांगितले. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री म्हणून ‘चिक्कीताई’ काम करतात असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रेखा फड यांची तर प्रदेश सरचिटणीसपदी माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हेमा पिंपळे यांची निवड जाहीर केली.

Web Title: Betrayal, betrayal, but not everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.