विश्वासघात! मित्राकडे आला अन् सोने चोरून गेला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 02:48 PM2022-03-28T14:48:51+5:302022-03-28T14:49:31+5:30
मित्राला भेटायचे म्हणून आला आणि चोरी केली
औरंगाबाद : मित्राकडे आलेल्या तरुणानेच त्याच्या घरातून दोन तोळे सोने चोरल्याचा प्रकार २६ मार्च रोजी एन ५, सिडको भागात उघडकीस आला आहे. सिडको पोलिसांनी आरोपीला तत्काळ बेड्या ठोकत त्याच्याकडून एक तोळा सोने जप्त केले आहे.
प्रताप भांगे पाटील (रा. गल्ली क्र.४, रामनगर, मुकुंदवाडी) असे चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरखेड (ता. पाथरी, जि. परभणी) येथील नीला रामकिशन ढंगे (ह. मु. प्रियदर्शनी सोसायटी, एन-५, सिडको) या कामानिमित्त परिवारासह शहरात आल्या आहेत. त्यांचा तीस वर्षीय मुलगा दिव्यांग असून तो घरीच असतो. आरोपी प्रताप भांगे हा त्याचा मित्र आहे. २६ मार्च रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान तो ढंगे यांच्या घरी आला होता.
मित्राला भेटायचे म्हणून आलेल्या भांगेने त्यांच्या घरातून एक तोळ्याची एकदाणी व एक तोळ्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ढंगे यांनी सिडको ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात भांगेवर संशय व्यक्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी प्रताप भांगेला शोधून आणले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भांगेला खाक्या दाखविल्यानंतर एक तोळ्याची एकदाणी त्याने काढून दिली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास हवालदार भवरे करीत आहेत.