दोस्तीत विश्वासघात ! स्वयंपाक करत असलेल्या मित्राच्या पत्नीवर तरुणाचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 03:22 PM2020-02-13T15:22:20+5:302020-02-13T15:23:38+5:30
आरोपी आणि पिडीतेचा पती दोघेही मजूर आहेत
औरंगाबाद: स्वयंपाक करण्यासाठी आलेल्या मित्राच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन एका जणाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ४ फेबु्रवारी रोजी मिटमिटा परिसरात घडली. घाबरलेल्या पीडितेने१२ फेब्रुवारी रोजी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.
विकास उर्फ बबुदंर पाल(२७) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की,आरोपी आणि पीडितेचा पती हे दोघेही मजूर आहेत. ते मिटमिटा परिसरात शेजारी राहतात. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पीडितेच्या पतीने तिला जेवण तयार करण्याचे सांगितले. मात्र स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली भांडी त्यांच्याकडे नव्हते. यामुळे विकासच्या खोलीवर जाऊन जेवण तयार करून आण,असे तिच्या पतीने तिला सांगितले. पीडिता विकासच्या खोलीत गेली आणि तेथे स्वयंपाक करू लागली. तेथे असलेल्या अचानक विकासने खोलीचे दार आतून बंद केले.
याविषयी पीडितेने आरोपीकडे विचारणा केल्यानंतर त्याने तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोठेही वाच्यता केली तर तुला जिवंत सोडणार नाही,अशी धमकी त्याने पीडितेला दिली. आरोपीच्या धमकीमुळे प्रचंड घाबरलेली पीडिता आठ दिवसापासून गप्प होती. मात्र विकासने केलेल्या अत्याचारामुळे मानसिकदृष्ट्या ती पूर्णपणे खचली होती. तिचे कामात लक्ष लागत नसल्याचे तिच्या पतीच्या लक्षात आले. १२ रोजी पतीने विश्वासात घेऊन तिला विचारल्यानंतर तिने हंबरडा फोडत मनमोकळे केले. आरोपी विकासने जीवे मारण्याची धमकी देऊन ४ रोजी अत्याचार केल्याची माहिती तिने पतीला दिली. यानंतर पीडितेला धीर देत त्याने आरोपी विकासवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तिच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले. यानंतर पीडितेने पतीसह छावणी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध फिर्याद नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक ठोकळ तपास करीत आहेत.