स्वार्थातून आईचाच विश्वासघात; सांभाळण्यासाठी दिलेली २ लाखांची दागिने, घराची कागदपत्रे मुलगा आणि सूनेने हडपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:48 PM2020-12-19T12:48:45+5:302020-12-19T12:55:51+5:30
crime news in Aurangabad : याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिची सून आणि मुलाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
औरंगाबाद : विश्वासाने सांभाळण्यासाठी दिलेले सव्वा दोन लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे मुलगा आणि सून यांनी हाडपल्याचा प्रकार नुकताच नारेगांव येथे समोर आला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिची सून आणि मुलाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुलजार बेग मुघल बेग (४०,रा. नारेगांव) आणि आयेशा बेगम अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की , तक्रारदार रेहाना बेगम मुघल बेग या चिकलठाणा परिसरातील हिनानगर येथे लहान मुलगा आणि सूने सोबत राहतात. १३ ऑक्टोंबर रोजी त्यांचा सून आणि मुलासोबत किरकोळ वाद झाला. यानंतर त्या रागारागाने नारेगाव येथे राहणारा मोठा मुलगा गुलजारच्या घरी राहण्यास गेल्या. यावेळी त्यांनी सोबत नेलेले अर्धा किलो चांदीचे तोडे, २०ग्रॅम सोन्याची एकदाणी, ६ ग्रॅमचे गंठण, दहा ग्रॅमच्या सोन्याचा अंगठ्या, चांदीची वाळे, पट्ट्या आणि घराची कागदपत्रे विश्वासाने आरोपी सुन आणि मुलाकडे ठेवण्यासाठी दिले.
राग शांत झाल्यानंतर १७ ऑक्टोंबर रोजी त्या लहान मुलाकडे हिनानगर येथे जाण्यासाठी निघाल्या तेव्हा त्यांनी दागिने आणि कागदपत्रे परत मागितले असता तुम्ही तेथे एकटे राहता. दागिने आणि कागदपत्रे चोरी जाऊ शकते असे म्हणून ते आमच्याकडे सुरक्षित राहू द्या असे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून १७ ऑक्टोबर रोजी रेहाना या घरी गेल्या. दरम्यान काही दिवसांनी गुलजार आणि त्याची पत्नी रेहाना यांना भेटण्यासाठी गेला तेव्हा रेहाना यांनी त्यांच्याकडे दागिने आणि घराच्या कागदपत्राची मागणी केली असता. त्यांनी दागिने आणि कागदपत्रे मिळणार नाही, तुला काय करायचे कर, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगा आणि सुनेने विश्वासघाताने सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज आणि कागदपत्रे हाडपल्याचे लक्षात येताच त्यांनी शुक्रवारी रात्री एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.