'तिच्यासोबत राहण्यापेक्षा जेलमध्ये बरे'; बायकोशी भांडणानंतर विमानतळ उडविण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 01:24 PM2023-04-14T13:24:46+5:302023-04-14T13:29:16+5:30
नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे धावपळ, रिक्षाचालकाला पोलिसांनी पकडले
छत्रपती संभाजीनगर : मांगीरबाबाच्या जत्रेला जात असताना गाडीतील चार व्यक्ती उद्या व परवा विमानतळावर बॉम्बस्फोट करणार असल्याची चर्चा करीत होते, अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री ११:०८ वाजता आला. या फोनमुळे सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. एमआयडीसी सिडको पोलिसांसह बीडीडीएस, एटीएसच्या पथकाने विमानतळावर धाव घेतली. त्याठिकाणी तपासणी केल्यानंतर काहीच नसल्याचे स्पष्ट झाले. फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, त्याने बायकोसाेबत भांडण झाल्यामुळे असा फोन केल्यास पोलिस अटक करतील म्हणून चुकीची माहिती देणारा फोन केल्याचे सांगितले.
या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी १०० नंबरवर खोटी माहिती देणारा कारभारी कडुबा रिठे (४१, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) याच्या विरोधात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कारभारी रिठे याने बुधवारी रात्री ११:०८ वाजता १०० नंबरवर फोन करून उद्या व परवा विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. ही चर्चा आपण मांगीरबाबाच्या जत्रेला जाताना गाडीत ऐकल्याचेही त्याने स्पष्ट केले. तेव्हा नियंत्रण कक्षाने तत्काळ बीडीडीएस निरीक्षक सुशील जुमडे यांच्या पथकास कळविले. त्यानुसार बीडीडीएसचे निरीक्षक जुमडे, सहायक उपनिरीक्षक अजमत शेख, हवालदार नवनाथ शेळके, चेतन चव्हाण, सुनील काळे यांच्यासह डॉग हॅण्डलर प्रसाद लोखंडे हे चार्ली डॉगला घेऊन विमानतळावर पोहोचले. विमानतळाचा परिसर त्यांनी तपासला, मात्र काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्याचवेळी दहशतवाद विरोधी पथकानेही विमानतळावर धाव घेतली. सहायक उपनिरीक्षक दशरथ जाधव यांच्या तक्रारीवरून कारभारी रिठे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
असे केल्यास तरी जेलमध्ये जाईल
आरोपी कारभारी रिठे हा रिक्षाचालक आहे. त्याचे बायकोसोबत इतरांना वस्तू देण्यावरून वाद झाले होते. तुझ्यासोबत राहण्यापेक्षा जेलात गेलेले बरे म्हणून त्याने १०० नंबरवर चुकीची माहिती देण्यासाठी फोन केला. चुकीची माहिती दिल्यानंतर पोलिस गुन्हा दाखल करून जेलात टाकतील, अशी त्याची अपेक्षा होती. मात्र, तसे काही घडले नाही. कारभारी याचे मानसिक स्वास्थ्य बिघडलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.