दुष्काळाच्या नावाने चांगभलं! मराठवाड्यात अतिवृष्टीच्या काळातही टँकरचा मारा, करोडो खर्च
By विकास राऊत | Published: November 16, 2022 04:03 PM2022-11-16T16:03:22+5:302022-11-16T16:12:23+5:30
मराठवाड्यात टँकर घोटाळ्याचा शोध सुरू, गेल्या चार वर्षांत हजार मिमीपेक्षा जास्त पाऊस पडूनही टँकरद्वारे पुरविले पाणी
औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या नावाने टँकर लॉबीचे चांगभलं झाल्याची चर्चा वारंवार होते. मागील चार वर्षांत विभागात पर्जन्यमान सरासरी १ हजार मिलीमीटरच्या पुढे गेले असतानाही या काळात टँकरने पाणीपुरवठ्यावर विभागात कोट्यवधींचा खर्च झाला आहे. यात २०१८ ते २०२२ या काळात अंदाजे ३०० ते ४०० कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम टँकरद्वारे पाणी पुरविण्यावर खर्च झाल्याचा संशय आहे. याबाबत विधानसभा अधिवेशनात बीडमधील लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने सत्यता पडताळणीचे आदेश दिले आहेत.
शासनाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सुमारे ४०० अधिकाऱ्यांची तालुकानिहाय माहिती संकलनासाठी नियुक्ती केली आहे. लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, महसूल कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ५५ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी गटविकास अधिकारी कार्यालयात जाऊन टँकर कसे लावले, सुरू कधी केले, किती फेऱ्या झाल्या, याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करणार आहेत.
मराठवाड्यात १० वर्षांत शहरी व ग्रामीण भागातील १० पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा खर्च टँकर लॉबीला दिला आहे. दुष्काळाची इष्टापत्ती करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यापलीकडे दुसरी कुठलाही उपाय प्रशासकीय पातळीवर करण्यात आला नाही. परिणामी मराठवाड्यातील ८ हजार ५५० पैकी बहुतांश गावे आजही टंचाई सामना करीत आहेत. एकीकडे टँकरलॉबी पाच वर्षांत गब्बर झाली, तर दुसरीकडे पाच वर्षांत जाेरदार पाऊस होऊनही मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांचा आकडा कमी का होत नाही ? असा प्रश्न आहे. २०१५-१७ या दोन वर्षांत लातूरमध्ये थेट रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. टँकरच्या खर्चाव्यतिरिक्त जलयुक्त शिवार योजनेतही मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. असे असताना मराठवाड्याला पिण्याचे पाणी कायमस्वरुपी मिळावे, यासाठी काहीही नियोजन होताना दिसून येत नाही.
दशकभरात ८०० कोटींचा खर्च
मागील दहा वर्षांत ८०० कोटींचा खर्च टँकरने पाणीपुरवठा करण्यावर झाला आहे. २०१३ ते २०१७ या काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यावर तब्बल ४०१ कोटींच्या आसपास रक्कम खर्च करण्यात आली. ९ हजार २६५ टँकरने मराठवाड्यातील सुमारे १ कोटी जनतेला पाणी पुरविल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. त्यापुढे २०१८ पासून २०२२ पर्यंतच्या काळात ४ हजार ८०१ टँकरवर अंदाजे ३९९ कोटींचा खर्च करून टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशी फक्त याच काळातील होणार आहे.
२०१९ पासून पाऊस जास्त
२०१९ पासून विभागाच्या सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होतो आहे. या चारही पावसाळ्यात १ हजार मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. भूजल पातळीचे प्रमाणदेखील वाढले आहे. असे असताना टँकरने ग्रामीण भागात पाणी द्यावे लागले, हे विशेष.
वर्ष...........टँकर........अंदाजे खर्च
२०१३........२१३६........७८
२०१४........१४४४........४४
२०१५........४०१५........२२९
२०१६........ ९४०.........२५
२०१७........२१८.........१०
२०१८........९७३.........४५
२०१९........३,४०२......२१०
२०२०........३३२.........११७
२०२२........९४...........४२
एकूण.......१३,५५४....८००
(खर्च कोटी रुपयांत)