सावधान...! शक्यतो भरउन्हात घराबाहेर पडू नका, उष्णतेची लाट महिनाभर
By विजय सरवदे | Published: May 2, 2024 06:59 PM2024-05-02T18:59:26+5:302024-05-02T18:59:43+5:30
नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हापासून स्वत:चा बचाव करणे हाच पर्याय आहे.
छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता जाणवू लागली असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघातामुळे प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणे किंवा उन्हात कामे करणाऱ्या नागरिकांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हापासून स्वत:चा बचाव करणे हाच पर्याय आहे. दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागाने इशारा दिला आहे की, अजून महिनाभर तरी उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज असून प्रामुख्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांनी सतर्क राहावे.
तथापि, जि.प. आरोग्य विभागाने सर्व ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले असून या महिनाभराच्या कालावधीत उष्माघाताचा एकही रुग्ण आढळून आला नाही. परंतु सौम्य लक्षणे असलेल्या ५०० रुग्णांवर बाह्यरुग्ण सेवा विभागात उपचार करण्यात आले आहेत. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. कोणालाही दाखल करून घेण्याची गरज भासली नाही. या रुग्णांमध्ये डोकेदुखी, मळमळ होणे, लघवीला जळजळ होणे, अशक्तपणा जाणवणे आदी लक्षणे जाणवत होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडू नये, उष्माघाताची लक्षणे असलेला रुग्ण आल्यास तत्काळ दाखल करून त्याच्यावर उपचार करावेत, अशा लेखी सूचना दिल्या आहेत. उष्माघात कक्षामध्ये चोवीस तास कुलर सुरू ठेवून तो कक्ष थंड ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे. यासंबंधी आवश्यक औषधींचा पुरेसा साठा सर्व आरोग्य केंद्रांना पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात जवळपास १ लाख क्षारसंजीवनीचा (ओआरएस) साठा आहे.
काय करावे
- सतत पुरेसे पाणी पित राहावे, तहान लागली नसली तरीही थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे.
- ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (क्षारसंजीवनी) किंवा लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखे घरगुती पेय प्यावे.
- उन्हात बाहेर जाताना स्कार्फ, छत्री, टोपीचा वापर करावा.
- शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेरील कामे टाळावीत.
- उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित दवाखान्यात जावे