सावधान, ‘एलईडी स्क्रोलिंग बोर्ड’ही होतो ‘हॅक’, पोलिसांनी व्यापाऱ्यांना प्रात्यक्षिकच दाखवले
By राम शिनगारे | Published: December 9, 2022 08:14 PM2022-12-09T20:14:47+5:302022-12-09T20:17:20+5:30
पोलिस याबाबत सतर्क असून व्यापाऱ्यांसह विक्रेत्यांची बैठक घेतली आहे
औरंगाबाद : शहरात एलईडी स्क्रोलिंग बोर्डच्या वापराबाबत पोलिस सतर्क झाले आहेत. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिस आयुक्तालयात गुरुवारी शहरातील बोर्ड तयार करणाऱ्यांसह व्यापारी व पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सायबर पोलिसांनी बोर्ड हॅक होऊ शकतो, याचे प्रात्यक्षिकही व्यापाऱ्यांना दाखविले; तसेच कोणत्या प्रकारची खबरदारी घेण्यात यावी, याविषयी मार्गदर्शन केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांनी दिली.
शहरातील एलईडी स्क्रोलिंग बोर्ड तयार करणारे असेंब्लर, उत्पादक यांनी बोर्ड तयार करून विकताना प्रत्येकवेळी स्ट्राँग सेक्युरिटी असलेला पासवर्ड दिला पाहिजे. तो सर्वसामान्य असू नये, विकणाऱ्यांनी प्रत्येक ग्राहकांचे ‘केवायसी’चे रेकॉर्ड जतन करून ठेवले पाहिजे. प्रत्येक ग्राहकास पासवर्ड कसा बदलावा, याविषयीचे प्रशिक्षण मिळावे. कोणत्याही प्रकारचा पासवर्ड व सिक्युरिटी पिन नसणाऱ्या एलईडी स्क्रोलिंग बोर्डांची विक्री व खरेदीही करू नये, ग्राहकांनी पासवर्ड व सुरक्षा पिन बदलताना कोणालाही शेअर करू नये, दुकान बंद करताना एलईडी स्क्रिनही बंद ठेवावा, प्रत्येक वापरकर्त्यांनी एलईडी स्क्रोलिंग बोर्डची नोंदणी स्थानिक पोलिस ठाण्यात केली पाहिजे. हा स्क्रिन लावला जाणार आहे, त्या जागेच्या मालकी हक्काची किंवा भाडेकराराची कागदपत्रे पोलिसांकडे द्यावीत आणि वायफाय, ब्लूटूथचा ॲक्सेस देण्यात येऊ नये, अशा सूचना पोलिसांनी व्यापाऱ्यांना केल्या आहेत.
या बैठकीला पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त विशाल ढुमे, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.