खबरदार ! दारुड्या चालकांची नावे झळकणार पोलिसांच्या वेबसाईटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:05 PM2019-06-10T12:05:21+5:302019-06-10T12:09:08+5:30
अशा वाहनचालकांना कायमस्वरूपी अद्दल घडविण्यासाठी निर्णय
औरंगाबाद : दारू पिऊन वाहन चालविले तर खबरदार, दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडले गेल्यास कोर्टात खटला दाखल केला जातो. एवढेच नव्हे, तर पोलीस आयुक्तांच्या वेबसाईटवर तुमचे नाव झळकू शकते. आयुक्तालयाने जानेवारी ते एप्रिल मधील ६३ मद्यपी वाहनचालकांची यादीच वेबसाईटवर टाकली आहे.
रस्ते अपघात टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सतत विविध उपक्रम राबविले जातात. दारूच्या नशेत वाहन चालविणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. मद्यपी वाहनचालक स्वत:सोबतच रस्त्यावरील अन्य वाहनचालकांचेही प्राण धोक्यात घालतो. मद्यपी वाहनचालकांकडून होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेसोबतच विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी ब्रेथ अॅनालायझर यंत्र हातात घेऊन वाहनचालकांची तपासणी करतात. दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडल्यानंतर चालकांविरोधात गुन्हा नोंदविला जातो, तसेच त्यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल केला जातो. जानेवारी ते एप्रिलदरम्यान शहरातील वाहतूक शाखेने ६३ जणांना पोलिसांनी पकडून त्यांच्याविरोधात कोर्टात खटले दाखल केले.
या सर्व वाहनचालकांना न्यायालयाने दोषी ठरवून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली. वाहनचालकांनी न्यायालयाच्या आदेशानुसार दंडाची रक्कम भरली. मात्र, अशा वाहनचालकांना कायमस्वरूपी अद्दल बसावी, याकरिता पोलीस आयुक्तांनी मद्यपी वाहनचालकांची यादी संकेस्थळावर टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मद्यपी वाहनचालक म्हणून दोषी ठरलेल्या ६३ वाहनचालकांचे संपूर्ण नाव, पत्त्यासह त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावासह यादी संकेतस्थळावर टाकली आहे. त्यामुळे वेबसाईटवर नाव झळकू द्यायचे नसेल, तर खबरदार.