सतर्क रहा! सायबर क्राईममध्ये नवनवीन ट्रेंड; ४७ टक्क्यांनी वाढले गुन्हे, कोट्यावधींची फसवणूक

By सुमित डोळे | Published: June 17, 2023 01:39 PM2023-06-17T13:39:07+5:302023-06-17T13:39:19+5:30

जनजागृती करूनही नागरिकांना मोह आवरेना; ग्रामीण भागापेक्षा शहरात फसणाऱ्यांचे प्रमाण अधिक

Beware! New Trends in Cybercrime; Crimes increased by 47 percent, fraud of crores | सतर्क रहा! सायबर क्राईममध्ये नवनवीन ट्रेंड; ४७ टक्क्यांनी वाढले गुन्हे, कोट्यावधींची फसवणूक

सतर्क रहा! सायबर क्राईममध्ये नवनवीन ट्रेंड; ४७ टक्क्यांनी वाढले गुन्हे, कोट्यावधींची फसवणूक

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : वारंवार जनजागृती, माध्यमांमधून फसवणुकीचे वृत्त प्रकाशित होत असतानादेखील कमी कष्टात अधिकचा पैसा कमावण्याच्या मोहाला बळी पडणाऱ्या नागरिकांचा आलेख वाढताच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यांतच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेल्यांचे प्रमाण जवळपास ४७ टक्क्यांनी वाढले आहे. संपूर्ण २०२२ मध्ये १ हजार ८५३ नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. तर २०२३ च्या जून महिन्यापर्यंत हा आकडा १ हजार ८५३ च्या घरात पोहोचला आहे. यात दिवसाला सहा तक्रारदारांच्या मागे एक महिला असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

घटस्फोट घेतल्यानंतर एकटेपणा दूर करण्यासाठी ३१ वर्षीय सुहाना (नाव बदलले आहे) सोशल मीडियावर विरंगुळा शोधायला सुरुवात करते. तेथे एका विदेशात राहणाऱ्या भारतीय तरुणाची तिला रिक्वेस्ट येते. तिचा विश्वास संपादन करून नंतर कॉल, मेसेज सुरू होतात. तो भेटवस्तू पाठवल्याचे सांगतो. ते मिळवण्यासाठी कुरिअर कंपनी, एक्साइज अधिकारी, विमानतळ अधिकारी विविध शुल्क भरण्यास सांगून लाखो रुपये उकळतात. सुहाना पोटगीत आलेली सर्व रक्कम देऊन बसते. दिल्ली विमानतळावर भेटवस्तू आणायला जाते. मात्र, विमानतळावर गेल्यावर फसवणूक झाल्याचे कळते.

शहरातीलच एकाकी आयुष्य जगणारी ५० वर्षीय महिला अशाच प्रकारे १२ लाखांना फसली. नुकतेच १४ जून रोजी छावणी पोलिस ठाण्यात पार्ट टाइम नोकरीच्या नादात व्यावसायिकाने ५५ लाख गमावले, तर वडिलांच्या जुन्या पॉलिसीजच्या प्रकरणात एका नामांकित डॉक्टरने ७० लाख रुपये गमावले. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात बळी पडलेले असे दिवसाला साधारणपणे सहा तक्रारदार सायबर पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी येत आहेत. परंतु, अपुरे मनुष्यबळ, तांत्रिक अडचणी व सायबर गुन्हेगारांचे देशभरात पसरलेल्या अफाट नेटवर्कमुळे सायबर क्राइमचा वाढता आलेख पोलिसांसमोर नवे आव्हान बनत चालला आहे.

नवनवीन ट्रेंड, कोटी रुपयांची फसवणूक
-सायबर क्राइममध्ये फसवणुकीचा दिवसेंदिवस ट्रेंड बदलत आहे.
-गतवर्षी इन्स्टंट बँक लोन ॲपद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढले होते. सध्या पार्ट टाइम जॉब, वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून फसविण्याचे प्रमाण अधिक आहे. सोबतच सोशल मीडियावर मैत्री करून भामटे लाखो रुपये उकळत आहेत.

२०२३ (जानेवारी ते जून )
-ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे तक्रारदार - १ हजार १३६
-यापैकी ७२१ तक्रारींचा तपास सुरू आहे.
-जवळपास तीन कोटी रुपये या तक्रारदारांनी गमावले. त्यापैकी सायबर पोलिसांनी प्रयत्न करून ३३ लाख ३२ हजार रुपये वाचवले.
-यंदा २०२३ च्या जून महिन्यापर्यंत ४३६ सोशल मीडियाच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २५६ प्रकरणांचा निपटारा सायबर पोलिसांनी केला.

२०२२ मध्ये
-ऑनलाइन फसवणुकीचे तक्रारदार - १ हजार ८५३
-प्रमुख ७ गुन्ह्यांतच ८९ लाख ३३ हजार रुपये गमावले. त्यापैकी ४१ लाख ३७ हजार रुपये पोलिसांनी परत मिळवले.
-६७२ नागरिक सोशल मीडियाच्या फसवणुकीत अडकले. यात बदनामी, ब्लॅकमेलिंग, वादग्रस्त पोस्ट, विनयभंग, सेक्स्टॉर्शन, फेक प्रोफाइल, अकाउंट हॅक होण्याचे प्रकार घडले.
-२०२१ च्या तुलनेत फसणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला सहा तक्रारदारांमागे एक महिला असल्याचे मत पोलिसांनी नोंदवले. शिवाय ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. तर सोशल मीडिया, डेटिंग ॲपवरून फसवणूक झालेल्या महिलांचे प्रमाण वाढत आहे.

२०२१ मध्ये १ हजार ३०८ नागरिक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले होते. २०२३ मध्ये अवघ्या सहा महिन्यांत हा आकडा पार झाल्याने वर्षअखेरीस तो दहा पटींनी वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शहरापेक्षा ग्रामीणमध्ये प्रमाण कमी
शहराच्या ग्रामीण भागात मात्र ऑनलाइन फसणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मे २०२३ अखेरपर्यंत ग्रामीण सायबर पाेलिसांकडे ऑनलाइन फसवणुकीच्या ११५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात ६२ लाख ८१ हजारांची आर्थिक फसवणूक झाली होती.

मोबाइल वापरताना सतर्कता महत्त्वाची
गतवर्षीच्या तुलनेत वेगाने वाढत असलेले फसवणुकीचे प्रमाण चिंताजनक आहे. सायबर गुन्हेगार नवनव्या पध्दतीचा अवलंब करत आहेत. नागरिकांनी मोबाइल वापरताना सतर्क राहावे. फसवणूक झालीच तर तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घ्या. वेळीच तक्रार आल्यास पैसे वाचवणे सोपे जाते.
- प्रवीणा यादव, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

Web Title: Beware! New Trends in Cybercrime; Crimes increased by 47 percent, fraud of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.