खोटे जीएसटी नोंदणी असेल तर सावधान; विभागाने सुरु केली तपासणी मोहीम
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 17, 2023 07:59 PM2023-05-17T19:59:16+5:302023-05-17T19:59:40+5:30
१६ मे ते १५ जुलैदरम्यान जीएसटीचे अधिकारी व्यापारी प्रतिष्ठानच्या जीएसटी नोंदणी क्रमांक व अन्य कागदपत्रांची तपासणी करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : करचुकवेगिरीसाठी कोणी बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतला आहे किंवा कोणी शून्य रिटर्न दाखवून कर जमा करीत नसेल, अशा प्रतिष्ठानचा शोध घेण्यासाठी जीएसटी विभाग मंगळवार (दि. १६) पासून शहरात व्यापक तपासणी मोहीम सुरू करीत आहे.
केंद्र सरकारच्या आदेशाने जीएसटी विभागाने करचुकवेगिरी रोखण्यासाठी देशव्यापी मोहीम आखली आहे. १६ मे ते १५ जुलैदरम्यान जीएसटीचे अधिकारी व्यापारी प्रतिष्ठानच्या जीएसटी नोंदणी क्रमांक व अन्य कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्येही या मोहिमेला सुरुवात झाली असून, संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी तपासणी करणार आहेत. दोन महिने ही तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
तर होईल फर्म बोगस घोषित...
व्यवसाय एका ठिकाणी आणि जीएसटी प्रमाणपत्रातील पत्ता दुसऱ्या ठिकाणचा आढळून आला. तर जीएसटी अधिकारी ती फर्म बोगस असल्याचे घोषित करतील आणि कारवाई करतील.
चार्टर्ड अकाऊंटंटने क्लाइंटला कळविली माहिती
चार्टर्ड अकाऊंटंटने त्यांच्याकडील क्लाइंट्सना जीएसटी विभागाच्या तपासणी मोहिमेची माहिती कळविली आहे. आपल्या क्लाइंटकडे सर्व कागदपत्र, जीएसटी प्रमाणपत्र असल्याची ते खात्री करून घेत आहेत. आपल्या प्रामाणिक जीएसटीधारकाला कुठेही काही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे.
जीएसटी विभागाचे आदेश
१) कारखान्याच्या किंवा दुकानाच्या दर्शनी बाजूस फर्मचा जीएसटी नंबर, पत्ता, नाव असणे आवश्यक.
२) जीएसटी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
३) जिथे व्यवसाय चालू आहे तोच पत्ता जीएसटी प्रमाणपत्रावर अपडेट करावा, अन्यथा त्याला ५० हजार रुपये दंड लागेल.
४) विक्री आणि खरेदीची बिले असणे आवश्यक आहे.
५) व्यवसायाची जागा भाड्याने घेतली असेल तर वैध भाडेपत्र असावे.