सावधान.., तुमचा उपवास मोडतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 11:53 PM2016-07-07T23:53:24+5:302016-07-07T23:57:06+5:30
औरंगाबाद : आपण भक्तिभावाने उपवास व फराळामध्ये भगर खात असाल तर सावधान. कारण भगरीऐवजी तुमच्या ताटात तांदूळचुरीचा भात वाढलेला असू शकतो.
औरंगाबाद : आपण भक्तिभावाने उपवास व फराळामध्ये भगर खात असाल तर सावधान. कारण भगरीऐवजी तुमच्या ताटात तांदूळचुरीचा भात वाढलेला असू शकतो. हे वाचून आपणास धक्का बसला असेल. पण हे सत्य आहे, बाजारात हलक्या प्रतीच्या भगरीमध्ये तांदळाच्या चुरीची भेसळ केली जात आहे. बाजारभावापेक्षा किलोमागे २४ रुपयांनी स्वस्तही भगर मिळत असल्याने ग्राहकही ती खरेदी करीत आहेत. भेसळयुक्त भगरीबद्दल असलेल्या अज्ञानामुळे तुमचा उपवास न कळत मोडू शकतो.
आषाढाला सुरुवात झाली आहे. चातुर्मासालाही येत्या काळात सुरुवात होईल. या काळात उपवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. उपवासासाठी साबुदाण्याप्रमाणेच भगरीचाही खप मोठ्या प्रमाणात होत असतो. सध्या भगरीचे भाव ८८ रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.
यात सुटी भगर ७६ ते ७८ रुपये तर पॅकिंगमधील भगर ७६ ते ८८ रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. मात्र मागील आठवडाभरापासून शहरात काही विके्रते गल्लोगल्ली फिरून व आठवडी बाजारात बसून अवघ्या ६० रुपये किलोने भगर विकत आहेत. दुकानदाराकडे ८४ रुपये किलो मिळणारी भगर कोणी ६० रुपयांनी देत असेल तर कोणालाही खरेदीचा मोह पडणारच.