अंबड-जालना-वडीगोद्री चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन
By Admin | Published: September 8, 2014 12:20 AM2014-09-08T00:20:27+5:302014-09-08T00:53:21+5:30
अंबड : अंबड-वडीगोद्री-जालना चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अंबड येथे झाले. अंबड शहरासाठी नवीन बायपास रस्ता, जिल्ह्यात राजूर गणपती
अंबड : अंबड-वडीगोद्री-जालना चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अंबड येथे झाले. अंबड शहरासाठी नवीन बायपास रस्ता, जिल्ह्यात राजूर गणपती व मत्स्योदरी देवी मंदिरासाठी लिफ्टची सुविधा तसेच अंबड शहरासाठी जालना-जायकवाडी योजनेतून जोडणी अशा विविध कामांची घोषणा पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केली.
व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आ. संतोष सांबरे, नगराध्यक्षा मंगल कटारे, जि.प. गटनेते सतीश टोपे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री टोपे म्हणाले की, ३३८ कोटी रुपये खर्चाच्या वडीगोद्री-जालना मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या एक वर्षात पूर्ण करण्यात येईल. या मार्गाच्या चौपदरीकरणामुळे अंबड व घनसावंगी या दोन्ही तालुक्यांच्या विकासास मोठी चालना मिळणार आहे. व्यापार, शेती व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासास या मार्गाच्या चौपदरीकरणाने गती येणार आहे. याबरोबरच अंबड शहरातील व्यापाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे जड वाहतुकीसाठी शहराबाहेरुन बायपास काढण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. अंबड शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जालन्याचे आ. कैलास गोरटयांल व नगर परिषदेशी चर्चा सुरु करुन पाणी दराबाबत योग्य समाधान काढण्यात येईल. आगामी दोन ते तीन दिवसातच शहरास जायकवाडी-जालना योजनेतून जोडणी करण्यात येणार आहे.
जिल्हयातील राजुर येथील गणपती व मत्स्योदरी देवी मंदिरात वृद्ध, आजारी भक्तांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. मत्स्योदरी देवी मंदीरातील लिफ्टसाठी जिल्हा नियोजनातुन ६० लाख रुपये मंजुर करण्यात आले लिफ्टसाठीची सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून लवकरच लिफ्टच्या कामास सुरुवात होणार आहे. जंगी तलाव सुशोभीकरणासाठी ६ कोटी रुपयांच्या योजनेस पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असुन लवकरच सरोवर विकास प्रकल्प योजनेअंतर्गत जंगी तलावाचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जालना-वडीगोद्री मार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने या मार्गावरील अंबड शहरातील दुकानांचे बांधकाम पाडण्याबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्याकडे चिंता व्यक्त केली. याविषयी आपण कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली असता चौपदरीकरणासाठी शहरात मुबलक जागा उपलब्ध असल्याने कोणतेही दुकान पाडण्याची आवश्यकता नसल्याचे आपल्याला कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले आहे.