खुलताबाद-खिर्डी रस्त्यावर भगदाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:04 AM2021-07-21T04:04:37+5:302021-07-21T04:04:37+5:30
खुलताबाद : खुलताबाद ते खिर्डी रस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली असून पावसाळ्यात हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. मागील सहा ...
खुलताबाद : खुलताबाद ते खिर्डी रस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली असून पावसाळ्यात हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. मागील सहा वर्षांपासून या जीवघेण्या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. तरी देखील प्रशासनाकडून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
खुलताबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या खिर्डी गावचा रस्ता खडतर बनलेला आहे. जागोजागी मोठी भगदाडे पडली आहेत. वाहनधारकांना येथून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी चार कि.मी. अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना तब्बल अर्धा तास घालवावा लागतो. त्यामुळे वाहनधारकांकडून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
खिर्डी येथील बहुतांश शेतकरी हे भाजीपाल्याचे उत्पादन करतात. खुलताबाद, वेरूळ येथील आठवडी बाजारात ते भाजीपाला विक्री करण्यासाठी येतात. परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त बनले आहेत. बारा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम झाले होते. हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून खिर्डी, सालुखेडा या गावातील लोकांना या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या खड्ड्यांत पाणी साचत असल्याने खड्डयांचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ लागले आहेत.
-
फोटो :
खुलताबाद ते खिर्डी हा चार कि.मी. रस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे.