भगवान गडाचा दसरा मेळावा पुन्हा वादात; कृती समिती घेणार पायथ्याला मेळावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 12:30 PM2022-09-28T12:30:07+5:302022-09-28T12:31:38+5:30
भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या मेळाव्यास बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोगस पारगाव, अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीकासार, मालेवाडी गावातील ग्रामस्थांनी ठराव घेऊन विरोध दर्शविला आहे.
- अनिल लगड
बीड : भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा काही वर्षांपूर्वी खंडित झाली होती. ती पुन्हा भगवान गडाच्या पायथ्याशी सुरू करणार असल्याची भूमिका दसरा मेळावा कृती समितीने घेतली आहे. आता पुन्हा एकदा भगवान गडावरील दसरा मेळावा घेण्यावरून वादाला सुरुवात झाली आहे. परंतु, या मेळाव्याला गडाच्या पायथ्याशी असलेल्या नगर व बीड जिल्ह्यातील तीन गावांतील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दरम्यान, यानिमित्त भगवान गडावरील दसरा मेळाव्याचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर ना नेता राहील, ना पक्ष. संत भगवानबाबांनी सुरू केलेली परंपरा अखंडित सुरू ठेवण्यासाठी कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीला स्थान न ठेवता यावर्षी भगवान गडावरील होणारा दसरा मेळावा हा धार्मिक व सांस्कृतिक पद्धतीने होणार आहे. वारकरी संप्रदाय हरिनामाचा गजर करीत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. लेझीम, ढोल-पथक, वादक श्रीक्षेत्र भगवान गडाच्या पायथ्यापासून सुरू होऊन भगवान गडापर्यंत जाऊन संपेल. त्यानंतर तिथे सीमोल्लंघन खेळण्यात येईल. ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवान बाबांच्या पावन समाधीचे दर्शन घेतले जाईल, असे भगवान गडावरील दसरा मेळाव्याचे धार्मिक, सांस्कृतिक स्वरूप राहील, असे कृती समितीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजप नेते स्व. गोपीनाथराव मुंडे हे गडावर दसऱ्याला मेळावा घेत असत. यामुळे येथे राजकीय लोकांची ये-जा असे. यानंतर महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना येथे मेळावा घेण्यास विरोध केल्याने राजकीय मेळाव्याची परंपरा खंडित झाली होती.
भगवानगड सुरक्षित राहायला हवा
भगवानगड फक्त भाषणांपुरता आणि भांडणापुरता मर्यादित राहायला नको. त्याचे एक स्वतंत्र अस्तित्व असून, तिथे फक्त संत भगवान बाबांचे नाव असावे. यासाठी भगवानगड सुरक्षित राहायला हवा, यासाठी गडावरून कोणाचे राजकारण नको, अशी भूमिका महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी पूर्वीपासून घेतली आहे. त्यावेळी पायथ्याला मेळावा घेण्यास त्यांनी कोणतीही हरकत घेतली नव्हती. परंतु, उद्याच्या मेळाव्याबाबत अजूनही त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही.
जय भगवान महासंघात फूट
समाज बांधवांना एकत्र करण्यासाठी बाळासाहेब सानप यांनी जय भगवान महासंघाची स्थापना केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या संघटनेत काम करीत आहोत. परंतु, प्रत्येक वेळी वेगवेगळी भूमिका घेताना कोणालाही विश्वासात घेतले जात नव्हते. आम्हाला भगवानगड व भगवान भक्तीगड सावरगाव घाट दोन्हीही सारखेच आहेत. परंतु, सानप यांनी दोन दिवसांपूर्वी भगवानगडाच्या पायथ्याशी समाज मेळावा घेण्याचे ठरविल्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. या निर्णयामुळे समाज एकत्र येऊ शकत नाही. यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी स्वखुशीने राजीनामे देत आहोत, असे म्हटले आहे. गणेश ढाकणे (पुणे), खंडू खेडकर (पुणे), उद्धव सानप (पिंपरी चिंचवड), कैलास सानप, हनुमंत घुगे (पुणे), अशोक महाराज आघाव, कृष्णा महाराज गुदे, आकाश घोळवे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या दसरा मेळाव्याला विरोध केला आहे.
...अशी आहे मेळावा कृती समिती
बाळासाहेब सानप (औरंगाबाद), विनोद वाघ (बुलडाणा), दादासाहेब मुंडे (बीड), बाळासाहेब वाघ (नाशिक), देविदास खेडकर (अहमदनगर), शिवराज बांगर (बीड), रवींद्र नागरगोजे (उस्मानाबाद), राणाप्रताप पालवे (अहमदनगर), अशोक लाडवंजारी (जळगाव), ईश्वर बुधवंत (पुणे), विलास आघाव (हिंगोली), रमेश सानप (अहमदनगर), सुभाष जावळे (पुणे), दिलीप घुगे (हिंगोली), सुग्रीव मुंडे (बीड), बाळासाहेब ठाकरे (पुणे), गजानन ढाकणे (जालना), विनोद सानप (यवतमाळ), सचिन इप्पर (वाशिम), वैभव घुगे (अकोला) यांचा कृती समितीत समावेश आहे.
तीन गावांचा ठराव घेऊन विरोध
भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या मेळाव्यास बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोगस पारगाव, अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीकासार, मालेवाडी गावातील ग्रामस्थांनी ठराव घेऊन विरोध दर्शविला आहे. याबाबत त्यांनी अहमदनगर व बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.