भागवत कराड यांचे भेटीगाठींचे सत्र सुरू; वाटाघाटीत जागा भाजपाला सुटेल अशी अपेक्षा
By विकास राऊत | Published: March 28, 2024 05:17 PM2024-03-28T17:17:56+5:302024-03-28T17:19:02+5:30
जागा कुणाला सुटणार, याची नेमकी माहिती आ. शिरसाट यांच्याकडून मिळते काय, याची चाचपणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
छत्रपती संभाजीनगर : भाजपाकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ लढविण्यासाठी इच्छुक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट, खा. राहुल शेवाळे यांच्यात बुधवारी मुंबईत जागावाटपावरून चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी आ. शिरसाट आणि डॉ. कराड यांची भेट झाली होती. त्यानंतर शिरसाटांच्या कार्यालयात या दोघांमध्ये चर्चा होऊन मुंंबईत भेट घेण्याचे ठरले. त्यानुसार बुधवारी डॉ. कराड हे आ. शिरसाटांच्या मुंबईतील घरी गेले होते. जागा कुणाला सुटणार, याची नेमकी माहिती आ. शिरसाट यांच्याकडून मिळते काय, याची चाचपणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. भाजपाच्या गोटातून शिंदे गटात सर्व सपंर्क अभियान राबविण्यात येत आहे.
आ. शिरसाट यांनी बोलावले होते...
शिंदे गटाचे प्रवक्ते आ. शिरसाट यांनी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी बोलविले होते. त्यामुळे चर्चेसाठी आम्ही गेला होतो. शिंदे गट जागा लढू शकणार की नाही, यावर साधक-बाधक चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वस्तुस्थिती मांडण्यात येणार आहे, त्यानंतर पुढील निर्णय होईल.
- डाॅ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
आज तिढा सुटेल...
डॉ. कराड हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सर्वांच्या भेटी घेऊन ते मोट बांधत आहेत. त्या अनुषंगाने माझ्याकडेही आले होते. भाजपाला जागा सुटावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. बुधवारी रात्रीतून काय होईल, हे सांगता येत नाही. गुरुवारी जागा वाटपाचा तिढा सुटेल. शिंदे गटाचा दावा कायम आहे, आम्ही उमेदवार आयात करून ही जागा लढणार नाही.
--आ. संजय शिरसाट, प्रवक्ता शिंदे गट शिवसेना
जागा भाजपालाच सुटेल...
प्रदेशपातळीवर शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा भाजपाला सुटावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमची संघटन बांधणी पूर्ण झालेली आहे. प्रत्येक बूथपर्यंत आम्ही पाेहोचलो आहोत. भाजपाचा खासदार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता तळमळीने काम करण्याचा दावा करीत आहे. शिंदे गटाला जागा सुटणार या सध्या तरी अफवा आहेत.
---संजय केणेकर, प्रदेश सरचिटणीस