भाई, दादांनी दोन वर्षांत केले पाच खून; अवैध धंदे, नशेखोरांमुळे पुंडलिकनगर परिसरात अशांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 12:02 PM2021-08-11T12:02:30+5:302021-08-11T12:04:14+5:30
Crime News Aurangabad प्राणघातक हल्ला करणे, दगडफेक करणे, सामान्यांना अडवून लुटमार करण्यासोबतच हे नशेखोर तरुण रात्रभर चौकाचौकात बसून टवाळक्या करतात.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाई, दादांची दिवसेंदिवस दहशत वाढते आहे. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नसल्याने या भाई, दादांनी दोन वर्षांत पुंडलिकनगर, हनुमानगर, गारखेडा परिसरात तब्बल पाच खून ( Murder) केले आहेत. (five murders in two years in Pundalikanagar of Aurangabad )
पुंडलिकनगर, हनुमाननगर, गजानननगर, हुसेन कॉलनी, भारतनगर, गारखेडा परिसर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसर, भारतनगर, आनंदनगर, रेल्वे रूळ परिसरातील कष्टकऱ्यांच्या वसाहतीत अवैध दारू विक्रीचे अड्डे रात्रंदिवस सुरू असतात. दारूसोबतच नशेच्या गोळ्या, व्हाइटनर, गांजाची नशा करणाऱ्या तरुणांची गुंडगिरी वाढली आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी येथे रुजू झाल्यानंतर पुंडलिकनगरात नागरिक स्नेहसंमेलन घेतले होते. यात नागरिकांनी अवैध धंदे आणि नशेखोर तरुणांमुळे परिसरात अशांतता पसरल्याचे सांगितले होते. यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी दोन चार कारवाया केल्या. या क्षुल्लक कारवायांचाही काही दिवस समाजकंटकांना जरब बसला होता. मात्र, नंतर पोलिसांनीच दुर्लक्ष केले व पुन्हा भाई, दादांनी डोके वर काढले. या भाई, दादांनी दोन वर्षांत पाच खून केले.
प्राणघातक हल्ला करणे, दगडफेक करणे, सामान्यांना अडवून लुटमार करण्यासोबतच हे नशेखोर तरुण रात्रभर चौकाचौकात बसून टवाळक्या करतात. वाहनातील पेट्रोल चोरणे, चोरी, घरफोडी आदी गुन्हे ते करतात. आकाश राजपूत या तरुणाची रविवारी रात्री भरचौकात शेकडो नागरिकांसमोर हत्या करण्याचे धाडस या गुंडाच्या टोळीने केले. या टोळीची प्रचंड दहशत असल्याने जखमी आकाश ‘वाचवा, वाचवा’ म्हणून मदत मागत असताना कोणीही त्याच्या मदतीला धावले नाही. अन्य काही भाई, दादांच्या टोळ्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त आहेत.
दोन वर्षांत झालेल्या खुनाच्या घटना :
१) शिवजयंती मिरवणुकीत पुंडलिकनगर रोडवर तरुणाचा चाकूने भोसकून खून.
२) किरकोळ कारणावरून बेबी राऊत मायलेक आणि जावयाने शिंदे नावाच्या तरुणाचा भोसकून खून केला.
३) न्यायनगरात एका जणाचा खून.
४) विजयनगरात एकाचा खून.
५) हनुमाननगरात परवा झालेला तरुणाचा खून.