भजन, कीर्तन, इफ्तार चारा छावणीतच; १८ गावांतील शेतकऱ्यांचे महिनाभर हेच घर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:03 AM2019-05-26T06:03:05+5:302019-05-26T06:03:13+5:30
दुष्काळाच्या दिवसात जनावरांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून उभारलेल्या लोणी खुर्द येथील चारा छावणीत तब्बल १८ गावांतील शेतकऱ्यांचे छोटेसे गावच वसले आहे.
- मोबीन खान
वैजापूर (जि. औरंगाबाद) : दुष्काळाच्या दिवसात जनावरांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून उभारलेल्या लोणी खुर्द येथील चारा छावणीत तब्बल १८ गावांतील शेतकऱ्यांचे छोटेसे गावच वसले आहे. चार हजार जनावरे जगविण्यासाठी आलेली ही मंडळी दुष्काळात नव्या सोबतींमध्ये भजन, कीर्तन अणि रोजा इफ्तारबरोबर सुख-दु:खाच्या गोष्टी करताना दिसत आहेत.
तालुक्यातील डोंगरथडी भागांत भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकºयांनी आपली जनावरे जगविण्यासाठी या छावणीचा आधार घेतला आहे. सकाळी जनावरांना चारा-पाणी देण्याचे काम झाल्यानंतर येथे शेतकºयांच्या गप्पांचा फड रंगतो.
जनावरांच्या देखभालीसाठी चारा छावणीतच राहत असलेल्या हजारो शेतकºयांची देखभाल संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे. त्यांच्यासाठी अल्पदरात वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून दिली
आहे.
चारा छावणीत जनावरांसाठी दररोज ऊस, मका, पेंड आदी खाद्य दिले जाते. दिवसभर कडक ऊन असल्याने उन्हापासून जनावरांना त्रास होऊ नये याकरिता एका संस्थेच्या वतीने ग्रीन शेड नेटचेही वाटप करण्यात आले आहे. जनावरांना संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी संस्थेच्या वतीने खाजगी डॉक्टरांची टीम तैनात आहे.
>जनावरांना लेकरासारखं जपलंय
जनावरांना लेकरासारखं जपलंय. त्यामुळे ऐन दुष्काळात त्यांना ईकावे वाटंना. लई सरकारं आली अन् गेली, पर शेतकºयांच्या व्यथा काय सुटल्या नायत... अशी व्यथा आहे लोणी खु. येथील शेतकरी गजानन निकम यांची.