दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर

By प्रशांत तेलवाडकर | Published: June 27, 2024 07:18 PM2024-06-27T19:18:15+5:302024-06-27T19:19:18+5:30

रविवारी रस्ते अडविणाऱ्या विक्रेते, हातगाडी व रिक्षावाल्यांवर कारवाईची मागणी

Bhajimandi adjacent to Darga Chowk became a garbage depot; Vendors stalls on the street | दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर

दर्गा चौक लगतच्या भाजीमंडीचा झाला कचरा डेपो; विक्रेत्यांचे बस्तान रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर : शहानूरमियाँ दर्गा चौक लगतच्या श्रीहरी पॅव्हेलियनच्या जागेवर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभरात मोठी उलाढाल होत असली तरी नागरिकांसाठी हा बाजार गैरसोयीचा बनला आहे. मनपाने लाखो रुपये खर्च करून येथे बांधलेली भाजीमंडई अक्षरश: कचरा डेपो बनली व भाजी विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावरच बस्तान मांडणे सुरू केले. यामुळे सतत वाहतूक जाम होत आहे. वाहतूक पोलिस व मनपाचे हे अपयश आहे, अशी संतप्त भावना या परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली.

८ वर्षांपासून भाजीमंडई ओसाड
श्रीहरी पॅव्हेलियनच्या बाजूला २०१५ मध्ये भाजीमंडई उभारली. यात प्रत्येक रांगेत ५ गाळे असे ४० गाळे बांधण्यात आले. यात मोठा ओटा, वरती पत्र्याचे शेड व ओट्याखाली सामान ठेवण्यासाठीची छोटी खोली, असे चांगले डिझाइन तयार करण्यात आले. मात्र, येथे भाडे लागते म्हणून विक्रेत्यांनी रस्त्यावर भाजी विक्री करणे सुरू केले. यामुळे या बांधलेल्या मंडीकडे दुर्लक्ष झाले. आज तिथे कचरा डेपो बनला आहे. कुजलला भाजीपाला, दारूच्या बाटल्या, गाद्या, चटाई, प्लास्टिक येथे पडलेले असून तिथेच घाण केली जात आहे. यामुळे बांधकामासाठी आलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहे.

रस्त्यावर बस्तान, वाहतुकीला अडथळा
श्रीहरी पॅव्हेलियन समोरील रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने नाल्यावर मोठ्या प्रमाणात माती टाकून रस्ता रुंद करण्यात आला. येथील नाला छोटा झाला व रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान थाटणे सुरू केले. पार्किंग, त्यापुढे भाजी विक्रेते, हातगाडीवाले, त्यापुढे रिक्षावाले आणि उरलेल्या छोट्या जागेतून वाहने ये-जा करतात. यामुळे रविवारी सतत वाहतूक जाम होत असते.

विक्रेत्यांना बसवा भाजीमंडईत
लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या भाजीमंडईची संपूर्ण स्वच्छता करावी, दुरुस्ती करावी, तिथे लाइटाची व्यवस्था करावी. नंतर तिथे रस्त्यावरील विक्रेत्यांना सक्तीने बसवावे. जे विक्रेते रस्त्यावर बसतील, वाहतुकीला अडथळा आणतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Bhajimandi adjacent to Darga Chowk became a garbage depot; Vendors stalls on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.