पर्यटनासोबत भक्तीही; वेरुळातील कैलास लेणीत संपूर्ण रामायणाचे दर्शन
By संतोष हिरेमठ | Published: January 22, 2024 02:15 PM2024-01-22T14:15:19+5:302024-01-22T14:15:50+5:30
‘सियावर रामचंद्र की जय’!रामायणातील विविध प्रसंग कैलास लेणीत कोरण्यात आलेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत श्रीरामांचे दर्शन घडते. हो... हो... भगवान श्रीरामांचे दर्शन, तेही हजारो वर्षे जुन्या वेरूळ लेणीत. कदाचित अनेकांना हे माहीत नसेल. वेरूळ लेणीत श्रीरामांच्या दर्शनाबरोबरच रामायणातील अनेक प्रसंग कोरण्यात आले आहेत. पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांची भक्तीही साधली जाते.
वेरूळची कैलास लेणी हे संपूर्ण जगाला पडलेले कोडे आहे. एकसंध खडकातून कोरण्यात आलेली ही लेणी पाहण्यासाठी देश- विदेशांतून दररोज हजारो पर्यटक लेणीत भेट देतात. कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. वेरूळ लेणीमधील विविध प्रकारची शिल्पे पाहता या लेणीमध्ये संपूर्ण रामायण कोरलेले आहे. याठिकाणी भगवान श्रीरामांचे दर्शन घडते. कैलास मंदिरात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला रामायणातील विविध प्रसंग कोरण्यात आलेले आहेत.
रामायणातील कोणकोणते प्रसंग?
राजा दशरथांच्या पाया पडून वनवासात जाण्याची परवानगी घेताना श्रीराम, लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापलेला प्रसंग, सीतेकडे भिक्षा मागताना रावण, सीता हरणाचा प्रसंग, जटायू आणि रावणातील युद्धाचा प्रसंग, वाली आणि सुग्रीव यांच्यातील युद्धाचा प्रसंग, लंकेकडे जाणारे हनुमान, रावणासमोर बसलेले हनुमान, अशोक वाटिकेत बसलेल्या सीतामाता, रावणाने उचललेला कैलास पर्वत इ. प्रसंग कैलास लेणीत कोरण्यात आलेले आहेत.
वेळ पडतो कमी
रामायणातील विविध प्रसंग कैलास लेणीत कोरण्यात आलेले आहेत. हे प्रसंग जाणून घेण्यास पर्यटक जेवढा वेळ देतील, तेवढा कमीच आहे. त्याबरोबर लेणी क्र. १६ मध्ये शिवाची प्रार्थना करताना श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत.
-विवेक पाठक, गाइड, वेरूळ लेणी