विस्थापितांचे भक्तिनगर चिखलमुक्त झाले पण पाणीदार कधी होणार?
By साहेबराव हिवराळे | Published: February 15, 2024 02:38 PM2024-02-15T14:38:18+5:302024-02-15T14:38:18+5:30
एक दिवस एक वसाहत; डॉक्टर, वकील, आयटी सेक्टर ते सरकारी अधिकारी-कर्मचारी वास्तव्यास, पण तक्रार करण्यास पुढे येणार कोण?
छत्रपती संभाजीनगर : शहरात एक तपापूर्वी रस्ते रुंदीकरणाची मोहीम राबविली गेली आणि त्यातून अनेक कुटुंबे विस्थापित झाली. या विस्थापितांनी मग पिसादेवी रोडवर भक्तिनगर वसवले. काळ्या शेतजमिनीत वसलेल्या भक्तिनगरवासीयांना तब्बल तपभर चिखल तुडवावा लागला. आता काही रस्ते सिमेंट काँक्रिटचे झाले असून जलवाहिनीही टाकण्यात आली. पण त्यातून पाण्याऐवजी फस्स हवा तेवढी येते. यातून नळाला पाणी कधी येणार याची प्रतीक्षा रहिवाशांना आहे. वीज पुरवठाही कमी दाबाने असल्याने घरातील वीज उपकरणे शोभेची बनली आहेत.
भक्तिनगरात डॉक्टर, वकील, आयटी सेक्टर ते सरकारी अधिकारी- कर्मचारी वास्तव्यास आहेत. तरीही तक्रार करण्यास कुणीही पुढे धजावत नाही. त्यामुळे प्रश्न सुटणेही अवघड झाले आहे. यशवंतनगरातील तीन गल्ल्यांतील रस्ते अजूनही मातीचेच आहेत. त्यामुळे रहिवाशांना पावसाळ्यात चिखलातून येजा करावी लागणार आहेच. शेतजमिनीतील ही वसाहत असल्याने सर्वांनी बोअरवेलच घेतले. हे पाणी वापरासाठी आणि जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे.
वसाहतीत कचरागाडी येते परंतु सफाई कर्मचारी फिरकत नाहीत. घंटागाड्यांतील कचरा वाहतूक करणाऱ्यांनी कचरा गोळा करून तो सुरळीत वसाहतीबाहेर नेऊन टाकावा जेणेकरून परिसरात अस्वच्छता पसरणार नाही, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
सरपटणारे प्राणी आढळतात....
सध्या रस्ते गुळगुळीत झाल्यामुळे घरापर्यंत लहान मुलांंना आणि ज्येष्ठांना ये-जा करणे सोयीचे ठरते आहे. परंतु लगत परिसरात शेती आणि मोंढा असल्याने सरपटणारे प्राणी अनेकदा अंगणात दिसतात. अशा वेळी सर्पमित्रांना बोलवावे लागते. परंतु सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वॉर्डात आठवड्यातून एकदा तरी स्वच्छता करावी व औषध फवारणी करावी.
-सुशीला गायकवाड
जलवाहिनी दिसते, पाणी नाही...
यशवंतनगरात तीन रस्ते सिमेंट काँक्रिट विनाच सोडले आहेत. आम्ही स्वखर्चाने ड्रेनेज लाइन टाकली. आता नुकतीच जलवाहिनी टाकली आहे परंतु त्यास पाणीदेखील सोडण्यास आलेले नाही. पावसाळ्यात तर नागरिकांना दरवर्षीप्रमाणे चिखल तुडवावा लागणार आहे. शाळकरी मुलांना मुख्य रस्त्यावर आणून सोडावे न्यावे लागते. किती दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे.
- अन्वर शहा
गुंठेवारीचा मोठा प्रश्न
गुंठेवारीचा प्रश्न सुटलेला नसल्याने नागरिकांना बँका कर्ज देत नाहीत. कर वसुली केली जाते; पण मनपात असूनही खेड्यागत अवस्था आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्यांना सोडविण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
-जिजाबाई जमधडे
शहरात जाण्याची गरज नाही...
प्रत्येक बारीकसारीक वस्तूंसाठी पूर्वी शहरात जावे लागत होते; आता पिसादेवी रस्त्यावर हॉस्पिटल, हॉटेल, मंगल कार्यालये, दुकाने आहेत. त्यामुळे शहरात जाण्याची गरज नाही. भक्तिनगरात जलवाहिनी टाकावी, अशी मागणी आहे.
-कैलास काकडे