भक्तिरसाने नाथनगरी चिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:22 AM2018-03-09T00:22:43+5:302018-03-09T00:23:00+5:30

शरण शरण एकनाथा। पायी माथा ठेविला ।। नका पाहू गुण दोष। झालो दास पायाचा ।। नाथषष्ठीसाठी पैठणनगरीत आलेल्या लाखो वारक-यांनी गुरुवारी परत एकदा नाथ समाधीचे दर्शन घेत मनोभावे आपली श्रध्दा नाथांना अर्पण केली.

 Bhaktikarasan nuthagiri chimb | भक्तिरसाने नाथनगरी चिंब

भक्तिरसाने नाथनगरी चिंब

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : शरण शरण एकनाथा।
पायी माथा ठेविला ।।
नका पाहू गुण दोष।
झालो दास पायाचा ।।
नाथषष्ठीसाठी पैठणनगरीत आलेल्या लाखो वारक-यांनी गुरुवारी परत एकदा नाथ समाधीचे दर्शन घेत मनोभावे आपली श्रध्दा नाथांना अर्पण केली. कळत नकळत हातून काही चुकले असल्यास क्षमा करावी, म्हणून दोन्ही हाताने कान धरून संत एकनाथांच्या समाधीसमोर मनमोकळे केले. दरम्यान, शहरभर विसावलेल्या वारकºयांच्या राहुट्यातून भक्तिभावाच्या सुराने अवघी पैठणनगरी आज चिंब झाली होती.
नाथषष्ठीसाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या दिंड्या शहरभर विविध भागात विसावल्या आहेत. आज तसा वारकºयांच्या विश्रांतीचा दिवस; देवाच्या घरी व देवाच्या दारी विसावा घेण्याचा दिवस असल्याने आज वारकरी निवांत दिसून आले. मध्यरात्री निघणाºया नाथांच्या छबीना पालखीत सहभागी होण्याची तयारी वारकरी करत होते. दरम्यान, सकाळी नाथांच्या पादुकांची नाथवंशजांनी विधीवत पूजा केली.
आध्यात्मिक वस्तूंची खरेदी वाढली
दरम्यान, आज वारक-यांना निवांत वेळ उपलब्ध असल्याने यात्रा मैदानातील विविध दुकानातून वारकरी महिला व पुरूषांनी अध्यात्मिक वस्तंूची खरेदी केली. यात हार्मोनियम, पखवाज, मृदंग, टाळ, वीणा, खंजीरी, डफ आदी भजनाचे साहित्य, गळ्यातील तुळशी माळ, कुंकू ,बुक्का, अष्टगंध, प्रसाद, विविध देवांच्या मूर्ती, समई, निरंजणी, मंदिरातील घंटा, विविध धार्मिक ग्रंथ, पुस्तके अशा नानाविध वस्तूंची खरेदी वारकरी करत असल्याचे चित्र आज दिसून आले.
नाथषष्ठी म्हणजे वारकºयांच्या खरेदीचा वार्षिक मॉल असतो. जे जे हवे असेल ते ते या नाथषष्ठीसाठी आल्यानंतर खरेदी केले जाते. गेल्या तीन षष्ठींवर दुष्काळाचे सावट असल्याने वारकºयांच्या खरेदीवर याचा प्रतिकूल परिणाम झाला होता. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वारकºयांची खरेदी शक्ती घटल्याचे दिसून आले होते. अष्टगंध, बुका, गळ्यातील माळ, यापलिकडे वारकरी जास्त खरेदी करत नसल्याचे दिसून आले होते. यंदा मात्र पिकपाणी परिस्थिती बरी असल्याने गावागावात वर्गणी करून यात्रेतून टाळ, मृदंग, लाउडस्पीकर, वीणा आदी भजनाचे साहित्य वारकरी यात्रेतून खरेदी करत होते. गतवर्षापेक्षा यंदा विक्री चांगली आहे, असे या साहित्याचे विक्रेते विकास सांगलीकर यांनी सांगितले.
नाथ संस्थानकडून दिंडीप्रमुखांचा सत्कार
नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंडीप्रमुख व पालखी प्रमुखांचा नाथ संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, विश्वस्त ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, नंदलाल काळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन दिंडीप्रमुखांचा सत्कार करण्यात आला. पुढील वर्षी पुन्हा नाथषष्ठीसाठी या असे निमंत्रण त्यांना देण्यात आले. यावेळी नाथ संस्थान व प्रशासनाकडून चांगल्या सोयी -सुविधा वारकºयांना मिळाल्याचे अनेक दिंडीप्रमुखांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
विविध काठांच्या उपरण्याला मागणी
वारकरी संप्रदाय आणि उपरणे यांचे नाते तसे जुनेच. षष्ठीला येणारा प्रत्येक वारकरी हा उपरणे घेतोच. विविध प्रकारचे आकर्षक काठाचे उपरणे गळ्यात टाकून तो षष्ठीच्या कीर्तनाचा आनंद घेतो. यंदा षष्ठीमध्ये आकर्षक व मोठ्या काठाच्या उपरण्याची मागणी मागच्या वर्षांपेक्षा वाढली आहे. सरासरी ५० रुपयांपासून २०० रुपयापर्यंत उपरणे विक्रीला उपलब्ध आहे. नागपुरी काठ, गंगा-जमुना काठ, रेशमी काठ, जरी किनार अशा वेगवेगळ्या व आकर्षक उपरण्याची मागणी वारकरी करत आहेत, असे येथील कापड व्यापारी पवन लोहिया यांनी सांगितले.
देवाच्या दारी नाथनगरीतील वास्तव्याचा आनंद वारक-यांच्या चेह-यावरून ओसंडून वाहात होता. फडाफडात भोजनाच्या पंगती उठत होत्या. या पंगतीतून केला जाणारा आग्रह व भेट होताच एकमेकांचे जय हरी म्हणत केलेले चरण स्पर्श, कुठलाही बडेजाव नसलेल्या सर्वसामान्य वारकºयांची देवाप्रती असलेली श्रध्दा व एकमेकांबद्दल असलेला आदर मनाचा ठाव घेणारा होता.

Web Title:  Bhaktikarasan nuthagiri chimb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.