पावत्या मागताच अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी !
By Admin | Published: March 18, 2017 12:05 AM2017-03-18T00:05:00+5:302017-03-18T00:08:06+5:30
अणदूर काही ग्रामस्थांनी निधी ज्या-ज्या बाबीवर खर्च झाला त्याच्या पावत्या सादर करा, असे म्हणताच उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.
दयानंद काळुंखे अणदूर
तुळजापूर तालुक्यातील अणूदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळालेल्या निधीच्या खर्चाचा हिशोब ग्रामस्थांसमोर मांडला. परंतु, काही ग्रामस्थांनी निधी ज्या-ज्या बाबीवर खर्च झाला त्याच्या पावत्या सादर करा, असे म्हणताच उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. पावत्या आॅडीटसाठी जिल्हा कार्यालयाकडे सादर केल्याचे सांगत त्यांनी वेळ मारून नेला.
राष्ट्रीय आरोग्य मिशन व लोकाधारीत देखरेख प्रकल्पांतर्गत हॅलो मेडिकल फाऊंडेशन संस्थेने अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सामाजिक अंकेक्षण १७ मार्च रोजी केले. त्यानुसार २०१५-१६ या वर्षामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या रुग्णकल्याण समिती व देखरेख समितीसाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या वतीने २ लाख ९७ हजार ८९२ रुपये आले होते. त्यातील त्यांनी २ लाख १७ हजार ८४ रुपये खर्च केला असून, ८० हजार ८०८ रुपये समितीकडे शिल्लक आजघडीला असल्याचे सामाजिक अंकेक्षणामध्ये दिसून आले. त्यामध्ये स्टेशनरी व झेरॉक्साठी ५७ हजार ४४२, उपकरण देखभाल दुरुस्ती ३९ हजार ४८२, औषधे ३२ हजार १८१, स्वच्छता २५ हजार ८३९, उपकरण खरेदी २१ हजार ४३३, मानधन १८ हजार ०००, इतर किरकोळ खर्च १६ हजार १०७, लॉन्ड्री ६, ६०० असे २ लाख १७ हजार ०८४ रुपये खर्च झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राने जाहीर केले. त्यात शिवशंकर तिरगुळे यांनी इतर व किरकोळ खर्च काय? स्टेशनरी, झेरॉक्स व फोन बिलासाठी ५७४४२ खर्च कसा? किरकोळ खर्चाची यादी व पावती दाखवा असे म्हटल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सर्वांची बोलती बंद झाली. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला आॅफिसमधून पावत्या आणण्यास सांगितले असता, तब्बल अर्धा तास विलंबाने ‘पावत्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे आॅडिटसाठी पाठविल्या आहेत’, असे सांगून वेळ मारून नेली.
प्राथमिक आरोग्य केंद्रास स्टेशनरीही वर्षाला एकदाच येते. रुग्ण कल्याण समितीमधील औषधाचा खर्च हा डिलेव्हरीसाठी लागणाऱ्या महत्वाच्या औषधांसाठी करतो. आलेला निधी हा रुग्णाच्या कल्याणासाठीच केला जातो. किती निधी आला, किती खर्च झाला याचा हिशोब आम्ही ठेवतो, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा वागदकर म्हणाल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वती घोडके, माजी पं.स. सदस्य साहेबराव घुगे, धनराज मुळे, एस.जी. डावरे, व्ही.व्ही. माळी, गुरुनाथ कबाडे, बसवराज जमादार, भालचंद्र कांबळे, देविदास जवळगे, नागेश मुळे, सयाजी गायकवाड आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक जावेद शेख यांनी केले. सूत्रसंचालन बसवराज नरे यांनी तर आभार प्रबोध कांबळे यांनी मानले.