...तर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये शिवसेना स्टाईल आंदोलन होईल - अब्दुल सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 06:05 PM2020-12-08T18:05:08+5:302020-12-08T18:09:43+5:30
Bharat Bandh : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात सिल्लोड मध्ये केंद्राच्या शेतकरी कायद्या विरोधात आंदोलन
सिल्लोड : केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, त्यांची मागणी रास्त आहे. जर केंद्र सरकारने या कायद्यात सुधारणा केली नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसैनिक दिल्लीत धडकून शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करतील असा इशारा शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला.
तालुक्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात केंद्राच्या नव्या शेतकरी कायद्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलकांनी ठिय्या मांडून केंद्राच्या नव्या शेतकरी कायद्याच्या निर्णयाची होळी केली. यावेळी सत्तार म्हणाले की, दिल्लीमध्ये आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलक शेतकरी थंडीत ठाण मांडून बसलेले आहेत. केंद्राने नव्याने आणलेल्या तीनही कायदे हे शेतकरी विरोधात असून याचा फायदा व्यापारी व उद्योजकानाच होणार आहे. आज कोणतीही निवडणूक नाही, यात राजकारण करण्याची ही वेळ नाही. त्यामुळे केंद्राने शेतकऱ्यांना वेठीस न धरता न्याय द्यावा. शेतकरी आपला न्याय व हक्क मागत आहेत. शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर शिवसेना हे कदापि खपून घेणार नाही असे स्पष्ट करत सत्तार यांनी केंद्राने शेतकऱ्यांच्या विरोधातील तीनही जुलमी कायदे रद्द करावे अशी मागणी केली.
या आंदोलनामुळे औरंगाबाद - जळगाव महामार्गावर जवळपास दोन तास चक्का जाम झाला होता. आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. यावेळी आंदोलकांनी भाजप व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळपासूनच शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, डॉ. संजय जामकर, पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे, बाजार समितीचे संचालक नरसिंग चव्हाण, सतीश ताठे, सुधाकर पाटील , शंकरराव खांडवे, राजुमिया देशमुख,डॉ. दत्ता भवर आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
शहरात कडकडीत तालुक्यात संमिश्र प्रतिसाद
सिल्लोड शहरात शेतकऱ्यांसोबत शिवसेना रस्त्यावर उतरल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला. तर तालुक्यातील उंडणगाव, अंभई, शिवना, गोळेगाव, अजिंठा, भराडी, आमठाणा, बोरगाव बाजार, पालोद, अंधारी, भवन येथे भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
सिल्लोड शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे, पोलीस उप निरीक्षक सुनील अंधारे, पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक विकास आडे,अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गिरीधर ठाकूर, फौजदार राठोड, अक्रम पठाण, प्रवीण बोदवडे, प्रल्हाड, बाबा चव्हाण,पोलीस कर्मचारी शेख रशीद, कडूबा भाग्यवंत, गैहिनीनाथ गीते, रामानंद बुधवंत,सुनील तळेकर,विठ्ठल ढोके, विलास सोनवणे, शेख मुश्ताक, दयानंद वाघ, विष्णू पल्हाळ यांनी बंदोबस्त केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.