भारत बटालियनने सार्थ ठरवले ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे ब्रीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:04 AM2021-07-15T04:04:16+5:302021-07-15T04:04:16+5:30
औरंगाबाद : समाजकंटकांशी रस्त्यावर दोन हात करणारे भारत बटालियनचे जवान, कोरोनाची साथ रोखण्यासाठीही रस्त्यावर महिनोन्महिने उभे ठाकले अन् त्यातील ...
औरंगाबाद : समाजकंटकांशी रस्त्यावर दोन हात करणारे भारत बटालियनचे जवान, कोरोनाची साथ रोखण्यासाठीही रस्त्यावर महिनोन्महिने उभे ठाकले अन् त्यातील अर्धेअधिक जवान कोरोनाग्रस्तही झाले. पण या बहाद्दरांनी कोरोनालाही चारीमुंड्या चीत केले. या बटालियनने बुधवारी सामाजिक दायित्व निभावतांना उत्स्फूर्त रक्तदान करून, ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ हे पोलीस दलाचे ब्रीद सार्थ ठरविले.
लोकमतचे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान पंधरवड्यात बुधवारी सातारा परिसरातील भारत बटालियनमध्ये झालेल्या शिबिरात ८६ जवानांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.
कोविड संसर्गामुळे रखडलेल्या शस्त्रक्रिया दीड वर्षांनंतर पुन्हा सुरू झाल्या. पण राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकमत समूहाने राज्यभरात ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेतला. भारत बटालियनचे समादेशक मधुकर सातपुते यांनी रक्तदान करून शिबिराचे औपचारिक उद्घाटन केले. यानंतर रक्तदानासाठी जवानांनी रांगा लावल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून अवघ्या दोन ते अडीच तासांत ८६ जवानांनी रक्तदान केले. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी दर्डा यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. समादेशकांनी भारत बटालियनच्या स्थापनेपासून आतापर्यंत जवानांनी स्वकष्टातून ओसाड परिसरात सुमारे ५० हजार झाडे लावून ती जगविल्याचे नमूद केले. शिवाय परिसरातील डोंगरावर आणि परिसरात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची व्यवस्था केली. यामुळे भूजल पातळी वाढल्याचेही सांगितले. घाटी रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीने रक्तसंकलन केले. या शिबिरासाठी समादेशक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक समादेशक इलियास शेख, सहायक समादेशक दिलीप तावरे, उपनिरीक्षक चव्हाण, प्रदीप पाटोळे, विशाल पगारे, हवालदार पुरुषोत्तम आघाव, राजाभाऊ खटाने, शिवराज पटवारी आणि उमेश तेजनकर यांनी पुढाकार घेतला.
----------------
चौकट
५५० जवानांची कोरोनावर मात
भारत बटालियनचे जवान गतवर्षापासून कोरोनाबाधित वसाहतीत बंदोबस्त करीत होते. त्यात ५५० जवान कोरोनाबाधित झाले होते. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न आणि मनोबल उंच ठेवल्याने सर्व बाधित जवानांनी कोरोनावर मात केल्याचे समादेशक सातपुते यांनी सांगितले. लोकमतच्या महारक्तदान शिबिराच्या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.