भरधाव घंटागाडीने दुचाकीला उडवले; महिला जागीच ठार, पती जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 07:20 PM2021-03-01T19:20:48+5:302021-03-01T19:22:03+5:30
घंटागाडीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
कन्नड : धुळे-सोलापुर महामार्गाच्या येथील बायपास रोडवर नगरपरिषदेच्या घंटागाडीने एका दुचाकीला पाठीमागुन जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी ३.४५ मिनिटांच्या दरम्यान घडला. प्रिंयका भगवान पाडळे असे मृत महिलेचे नाव आहे.
आज दुपारी भगवान शिवाजी पाडळे (३२, रा.पिंपरखेडा ता.कन्नड) हे पत्नी प्रियांका सोबत दुचाकीवर ( क्रमांक एमएच २० बीएफ १५८५ ) बायपासवरून औरंगाबादच्या दिशेने जात होते. यावेळी नगरपरिषदेची घंटागाडी (क्रमाक एमएच २० इएल ५५८९) पाठीमागून भरधाव वेगात आली. घंटागाडीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला तर भगवान पाडळे गंभीर जखमी झाले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे व अंधानेरचे सरपंच अशोक दाबके हे कामानिमीत्त औरंगाबादकडे जात असतांना त्यांनी घडलेल्या अपघाताची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग वाहतुक शाखेचे सपोनि सुरेश भाले यांनी घटनास्थळी भेट दिली. वाहतुक सुरळीत केली.