भास्करराव पेरे पाटलांचा नादच खुळा, अशी केली गावकऱ्यांची दिवाळी गोड
By महेश गलांडे | Published: November 13, 2020 02:32 PM2020-11-13T14:32:26+5:302020-11-13T14:32:46+5:30
औरंगाबाद शहरापासून पंधरा-वीस किलोमीटरवर असलेल्या पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे.
औरंगाबाद - सोशल मीडियावर पाटोदाचे सरपंच पेरे पाटील यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. आपल्या नियोजनबद्ध आणि प्रामाणिक कामातून त्यांनी पाटोदा गावाला वेगळी ओळख निर्माण करुन दिलीय. आता, दिवाळीच्या तोंडावरही गावकऱ्यांसाठी चांगला उपक्रम राबवत ग्रामपंचायतीने गावकऱ्यांची दिवाळी गोड केलीय. गावकऱ्यांनी कोविडच्या संकटांतही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबियांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपयांनी देण्यात आली. विशेष म्हणजे प्रत्येक कुटुंबाला 25 किलो एवढी वाटप करण्यात आली.
औरंगाबाद शहरापासून पंधरा-वीस किलोमीटरवर असलेल्या पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे. तीन हजार 350 लोकसंख्या असलेल्या गावानं राज्यात आदर्श घालून दिले आहेत. आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळवलेल्या औरंगाबादजवळील पाटोदा ग्रामपंचायतीने गावातील 750 कुटुंबीयांना अर्ध्या किमतीत म्हणजेच 20 रुपये किलोप्रमाणे प्रतिकुटुंब 25 किलो साखर वाटून ग्रामस्थांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या बाजारात 40 रुपये किलोप्रमाणे मिळणारी साखर पेरे यांनी लातूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून 28 रुपये किलोप्रमाणे 100 क्विंटल विकत घेतली. यासाठी ग्रामपंचायतीला 3 लाख रुपयांचा खर्च करावा लागला. कारखान्याकडून साखर घेतल्यानंतर वाहतूक खर्च धरून ग्रामपंचायतीला 30 रुपये किलोप्रमाणे साखर मिळाली. जमा झालेल्या कराच्या रकमेतून प्रतिकिलोमागे 10 रुपयांची भरपाई करत ही साखर ग्रामस्थांना वाटण्यात आली. याबाबत बोलताना ग्रामविकास अधिकारी पी. एस. पाटील म्हणाले की, कोरोनामुळे गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दिवाळीसारखा सण गोड व्हावा, या उद्देशाने साखरवाटपाचा उपक्रम राबवला. यासाठी प्रशासक कमल मगरे, माजी सरपंच भास्कर पाटील पेरे, माजी उपसरपंच विष्णू राऊत यांनी परिश्रम घेतले.
भास्कर पेरे पाटील यांचे व्हिडिओही सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत असतात. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते गावचा कारभार कसा चालतो, गावाने कशारीतीने कामकाज केलंय, याबद्दलही माहिती देत असतात. त्यामुळे, सरपंच पेरे पाटील यांच्या पाटोदा गावाला आवर्जून पाहण्यासाठी लोकं जातात. तरुणाई या गावचा आणि सरपंचाचा आदर्शही इतरांना सांगतात.