भूमिपूजन दोन पदरीचे,घोषणा चौैपदरीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:11 AM2017-07-30T01:11:55+5:302017-07-30T01:11:55+5:30
सिल्लोड : सिल्लोड येथे शनिवारी केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद- जळगाव या १४७ कि.मी. दोन पदरी रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले;
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : सिल्लोड येथे शनिवारी केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद- जळगाव या १४७ कि.मी. दोन पदरी रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले; परंतु यावेळी खा. रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, आ. अब्दुल सत्तार आदींनी हा रस्ता चौपदरी करावा, अशी मागणी लावून धरल्याने गडकरींनी लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव हा रस्ता चौपदरी करण्याची घोषणा करून सर्वांना सुखद धक्का दिला.
या रस्त्यासाठी भूसंपादन करण्याची जबाबदारी मात्र रावसाहेब दानवे व आ. सत्तार यांना दिली. तुम्ही भू-संपादन करून द्या, चौपदरीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही गडकरी यांनी यावेळी दिले. माझ्या महाराष्ट्राला केंद्रातून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यात यशस्वी ठरलो. येत्या पाच वर्षांत ३ लाख कोटींची कामे महाराष्ट्रात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत ६५ हजार कोटी रुपयांचा विविध कामांसाठी निधी मराठवाड्याला दिला आहे. आणखी १० हजार कोटी रुपये देणार आहे. ही कामे डिसेंबरपूर्वी सुरू होतील, मराठवाड्याला निधी कमी पडू देणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे होते.