जयजयकार! मुुकुंदवाडीत भवानी मातेच्या यात्रेला प्रारंभ, २६ नवसधारकांनी ओढल्या बारा गाड्या!
By स. सो. खंडाळकर | Published: May 3, 2024 03:58 PM2024-05-03T15:58:38+5:302024-05-03T16:00:10+5:30
यात्रेच्या पहिल्या दिवशीचे आकर्षण म्हणजे नवसाच्या बारा गाड्या ओढणे. याला गतवर्षापेक्षा यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला.
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील भवानी माता यात्रेला गुरूवारपासून भाविकांच्या उत्साहात प्रारंभ झाला. ४ मे रोजी सायंकाळी ४ वाजता राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेने या यात्रेचा समारोप होईल. या स्पर्धेत सहा लाखांच्या कुस्त्या खेळविण्यात येतील. शेवटची कुस्ती दीड लाख रुपये बक्षिसाची राहील.
यात्रेच्या पहिल्या दिवशीचे आकर्षण म्हणजे नवसाच्या बारा गाड्या ओढणे. याला गतवर्षापेक्षा यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. नवस बोललेल्या एकूण २६ जणांनी या बारा गाड्या ओढल्या. परंपरेनुसार मंदिराचे पुजारी आमदार नारायण कुचे यांनीही गाडी ओढली. यावेळी मुकुंदवाडी पंचक्रोशीतील व आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून सुमारे पाच हजार भाविकांची उपस्थिती होती. अंबिकानगरच्या नाल्यापासून ते भवानी माता मंदिरापर्यंत म्हणजे किमान एक किलोमीटरपर्यंतच्या या अंतरात नवसधारक या गाड्या ओढतात. नवसाचे विविध प्रकार असतात. तसेच हिरालाल कुचे यांनी जिभेत गळ टोचून घेतले होते. गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाला मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या हस्ते नारळ फोडून सुरूवात झाली.
यावेळी मुकुंदवाडी भागातील प्रतिष्ठित नागरिक मोतीलाल जगताप, संतोष शिंदे, भाऊसाहेब जगताप, बाबासाहेब डांगे, दीपक खोतकर, ज्ञानेश्वर डांगे, संजय जगताप, कमलाकर जगताप, भाऊसाहेब राते, मोहन साळवे, गंगाधर गायकवाड, बन्सीलाल कुचे, किसन ठुबे, पप्पू ठुबे आदींची उपस्थिती होती. यावेळी ‘भवानी माता की जय’च्या घोषणा देत भाविकांनी रेवड्या उधळल्या. ३ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत भंडारा होईल व याचदिवशी संतोष महाराज आढावणे यांचे रात्री ८ ते १० यावेळेत कीर्तन होईल. रात्री ८ ते ११ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होतील. ४ मे रोजी सायंकाळी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कुस्त्यांची स्पर्धा होईल. गुरूवारी रात्री भवानी मातेचा रथ काढण्यात आला.