पर्यटकांसाठी फर्दापुरात भीम पार्क उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:41+5:302021-02-05T04:07:41+5:30

सिल्लोड : सुमारे ९० देशांतून अजिंठ्याला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आता नवे आकर्षण तयार होणार आहे. महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री ...

Bhim Park will be set up in Fardapur for tourists | पर्यटकांसाठी फर्दापुरात भीम पार्क उभारणार

पर्यटकांसाठी फर्दापुरात भीम पार्क उभारणार

googlenewsNext

सिल्लोड : सुमारे ९० देशांतून अजिंठ्याला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आता नवे आकर्षण तयार होणार आहे. महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून फर्दापूर येथे दहा एकर जागेवर भीम पार्क उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहावा, यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पासाठीचा सविस्तर प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले.

बैठकीत मुंडे म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी तयार होत असलेल्या स्मारकासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत सकारात्मक विचार केला जाईल. यासाठी लागणारा खर्च व इतर तपशिलासाठीचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा. त्याचप्रमाणे या भीम पार्कचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विषय तज्ज्ञांची समिती नेमण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

पर्यटन विभागाच्या जागेवर हा प्रकल्प उभा राहणार असून, यात डॉ. बाबासाहेब यांचे जीवन, त्यांचे कार्य आणि त्यांनी केलेली चळवळ, त्यावेळेचे मंत्री, भारतीय राज्य घटनेमधील सहभाग या सर्व बाबींचा समावेश असेल, अशी माहिती राज्यमंत्री सत्तार यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभ्यासक, तसेच विचारवंत, बौद्ध धम्मातील भंतेजी, यांचे मत विचारात घेण्यासाठी सविस्तर बैठक घेऊन त्यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा या प्रकल्पात समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

चौकट

तीन वर्षांचा कालावधी, २५ कोटींचा खर्च

भीम पार्क परिसरात भव्य असे सुशोभित उद्यान तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री सत्तार यांनी सांगितले. दहा एकर परिसरात तयार होणाऱ्या या प्रकल्पास पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी आणि सुमारे २५ कोटी रुपये लागतील. हा निधी सामाजिक न्याय विभागामार्फत उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

फोटो कॅप्शन : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे बैठकीत दिसत आहेत.

Web Title: Bhim Park will be set up in Fardapur for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.