प्रशासनातील भीष्मपितामह भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:02 AM2021-02-25T04:02:06+5:302021-02-25T04:02:06+5:30

--- औरंगाबाद : महाराष्ट्रातील वयाने आणि अनुभवाने सर्वात ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे बुधवारी (दि. २४) ...

Bhishmapitamah Bhujangrao Kulkarni passed away | प्रशासनातील भीष्मपितामह भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन

प्रशासनातील भीष्मपितामह भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन

googlenewsNext

---

औरंगाबाद : महाराष्ट्रातील वयाने आणि अनुभवाने सर्वात ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे बुधवारी (दि. २४) दुपारी सव्वादोनच्या सुमारास निधन झाले. ५ फेब्रुवारीला त्यांनी १०४ व्या वर्षात पदार्पण केले होते.

राज्याच्या पहिल्या जनगणनेचे प्रमुख, पुणे मनपाचे आयुक्त, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, मुंबईचे महसूल आयुक्त, तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेतील महत्त्वाचे शिलेदार आणि पुढे २ वेळा कुलगुरू म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली.

स्वातंत्र्यपूर्व हैदराबाद संस्थानात १९३९ मध्ये प्रशासकीय नोकरीतून आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणारे भुजंगराव १९७४ च्या अखेरीस राज्याच्या सिंचन विभागाचे भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्य नियोजन मंडळावर व दांडेकर समिती सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. दांडेकर समिती, न्हावाशेवा बंदर, अकृषी-विद्यापीठांची लेखा समिती, मराठवाडा ग्रामीण बॅंक, कापूस एकाधिकार योजना पुनर्विलोकन समिती, राज्य नियोजन मंडळ, टेक्‍स्टाईल मिल, राज्य सिंचन आयोग, अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सरस्वती भुवन, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, सेंट्रॉन कंपनी, आयसीम कॉलेजसारख्या अनेक संस्थांद्वारे ते सतत कार्यरत राहिले.

त्यांच्या पश्चात मुलगा पद्माकर कुलकर्णी (अमेरिका), तर मंगला बट्टे (अमेरिका), डाॅ. उषा नांदेडकर या मुली आहेत. घाटीच्या नेत्ररोग विभागप्रमुख डाॅ. वर्षा नांदेडकर, शुभदा पाटील, नीरजा कुलकर्णी यांचे ते आजोबा होत. सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

---

अल्पपरिचय

---

- ५ फेब्रुवारी १९१८ गाढे पिंपळगाव (ता. परळी, जि. बीड) येथे शेतकरी कुटुंबात जन्म.

-१९३२ : औरंगाबाद येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण

-१९३४ : वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न

-१९३६ : हैदराबाद येथून ते प्रथम क्रमांकाने बी.एस्सी. उत्तीर्ण

-१९३८ : भौतिकशास्त्रामध्ये एम.एस्सी. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

-१९३९ : निजाम राजवटीत मेदक तालुक्यात ‘तहसीलदार’ या पदावर मुलकी प्रशासकीय सेवेत रुजू

-१९४० : ‘डिस्ट्रिक्ट लँड रेकॉर्ड ऑफिसर’ म्हणून औरंगाबाद येथे रुजू

- १९४७ ‘असिस्टंट कमिशनर’ या श्रेणी-१ च्या मुलकी सेवेत दाखल

-१९५० : आयएएस

-१९५३ : नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले

-१९५४ : भूमी आयोग स्थापन झाला. त्या विभागाचे सचिव म्हणून नेमणूक

-१९५६ : राज्य पुनर्रचनेमुळे मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांबरोबर मुंबई राज्यात औरंगाबादला जिल्हाधिकारी

-१९५९ : राज्याच्या जनगणनेसाठी ‘प्रमुख’ म्हणून काम पाहिले

-१९६५ : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त

-१९६९ : मुंबईत नगरविकास, आरोग्य व गृहनिर्माण या तीन खात्याचे सचिव म्हणून काम

-१९६९ : राज्याच्या सिंचन विभागाचा सचिव म्हणून जबाबदारी

-१९७४ : अखेरीस भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून निवृत्त.

Web Title: Bhishmapitamah Bhujangrao Kulkarni passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.