भोपाळमध्ये हिंदीचे स्वतंत्र विश्वविद्यालय आहे, महाराष्ट्रात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 12:05 PM2023-06-12T12:05:29+5:302023-06-12T12:07:13+5:30

केंद्रीय पर्यावरण व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी डॉ. सुधीर रसाळ यांना केली विचारणा

Bhopal has a separate university of Hindi, is there a separate university of Marathi in Maharashtra? | भोपाळमध्ये हिंदीचे स्वतंत्र विश्वविद्यालय आहे, महाराष्ट्रात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ आहे का?

भोपाळमध्ये हिंदीचे स्वतंत्र विश्वविद्यालय आहे, महाराष्ट्रात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ आहे का?

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : भोपाळमध्ये हिंदीचे स्वतंत्र विश्वविद्यालय आहे, तसे महाराष्ट्रात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ आहे का? असा रोकडा सवाल केंद्रीय पर्यावरण व कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रख्यात साहित्यिक व समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना विचारला. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंत्री भूपेंद्र यादव शनिवारी शहरात मुक्कामी असताना त्यांनी डॉ. रसाळ यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. रसाळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. ही चर्चा निखळ साहित्यावर होती. सर्व प्रादेशिक भाषांची होणारी अधोगती, निर्माण होणाऱ्या साहित्याचा सध्याचा प्रवाह यावर चांगलीच चर्चा रंगली. तेव्हा अचानक त्यांनी मराठी भाषा विद्यापीठाचा मुद्दा उपस्थित केला. मराठी भाषेचे जतन, संवर्धन व्हायचे असेल तर विद्यापीठ आवश्यक आहे, यावर दोघांचे एकमत झाले.

तामिळ, मल्याळम भाषेत विपुल साहित्य निर्मिती होते. सर्व प्रादेशिक भाषेत तसाच प्रवाह आला पाहिजे. तामिळनाडूत मठामध्ये तामिळ भाषेतून संस्कार आजही नेटाने होतात. त्यातूनच त्या भाषेत साहित्य निर्मितीस चालना मिळते. सर्व शिक्षण स्थानिक भाषेतून झाले पाहिजे, या मुद्द्यावर डॉ. रसाळांनी भर दिला. हवे तर इंग्रजीतील शब्दांचा प्रयोग तसाच करा. उदाहरणार्थ ॲाक्सिजन शब्द तसाच वापरा. युरोप, जपान, कोरिया, जर्मनी, चीन आदी देशांत पूर्ण शिक्षण त्यांच्या भाषेतच आहे. तरीही त्यांच्या प्रगतीत कुठेही अडथळा नाही, मग आपणच का इंग्रजीचे स्तोम माजवतो? असेही ते म्हणाले. यावेळी यादव यांच्या सोबत आ. प्रशांत बंब, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, विजय औताडे, हर्षवर्धन कराड आणि रसाळ कुुटुंबीयांतील वंदना रसाळ, हेमंत मिरखेलकर, अर्चना अकोलकर, सानिका अकोलकर आदींची उपस्थिती होती.

भेट संस्मरणीय 
माझा मुलगा अमेरिकेतील उत्तम नोकरी सोडून भारतात आला व त्याने छत्रपती संभाजीनगरात राहून स्टार्टअप इंडिया अंतर्गत आयटी कंपनी स्थापन केली. ही माहिती मी सांगितल्यावर मंत्री महोदयांनी आनंद व्यक्त केलाच; पण त्याच्याशी बोलून तो नेमके काय करतो, ही माहिती घेतली. निखळ आनंदाची ही भेट संस्मरणीय तर झालीच; पण औचित्यपूर्ण चर्चेने रंगत आणली. कुठलाही बडेजाव नाही. वायफळ चर्चा नाही. हा अनुभव सुखद होता, अशी बापूंची प्रतिक्रिया होती. ही चर्चा ऐकताना त्यात भाग घेताना मनस्वी आनंद झाला.
-हेमंत मिरखेलकर, उद्योजक

Web Title: Bhopal has a separate university of Hindi, is there a separate university of Marathi in Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.